Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:13 PM2020-02-12T15:13:40+5:302020-02-12T15:28:32+5:30

आज व्हॅलेनटाईन वीकचा सहावा दिवस असून आज Hug Day साजरा केला जातो. Hug Day च्या दिवशी लोक एकमेकांना प्रेमळ मिठी मारून, आपल्या भावना व्यक्त करतात. मात्र राजकारणात एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना, एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे बडे नेते जेव्हा गळाभेट घेतात तेव्हा सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेतलेली गळाभेटीची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु राजकारणातील इतर बड्या नेत्यांनी घेतलेल्या गळाभेटी देखील चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या.

राज्यात विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रिपद नाकारल्यामुळे शिवसेनेने युती तोडत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरु केली होती. जवळपास चार - पाच दिवस चर्चा सुरु असताना अचानक सकाळी एक बातमी आली की भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सर्वांना धक्का तेव्हा बसला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना पुन्हा पक्षात आण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य बड्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. यानंतर सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवार पुन्हा स्वगृही परतले आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यानंतर आमदारकीची शपथ घेण्यासाठी सर्व नवनिर्वाचित आमदार विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचं स्वागत केले होते. त्याचवेळी अजित पवार यांनी विधानसभेत एण्ट्री केली आणि सुप्रिया सुळे यांची गळाभेट घेतली होती.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली आणि सगळेच अवाक झाले होते. काँग्रेस ही एक भावना आहे. ती भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन, असं म्हणून राहुल यांनी भाषण संपवलं आणि ते वेलमधून थेट मोदींच्या खुर्चीकडे गेले. त्यांनी मोदींना आलिंगनासाठी उभं राहण्याची विनंती केली होती. पण, ते उभे राहत नाहीत, असं पाहून राहुल यांनी स्वतःच पुढे होत त्यांना मिठी मारली होती.

2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कुडाळ मतदारसंघातच पराभव स्विकारावा लागला होता. मात्र शेजारच्या कणकवली मतदारसंघात मात्र त्यांचा मुलगा नितेश राणे जिंकला होता. यावेळी नारायण राणे यांनी माझा राजकीय अस्त झाला आणि नितेशचा उदय झाला अशी प्रतिक्रिया दिल्याने नितेश राणे यांना अश्रु अनावर झाले होते. तेव्हा नितेश राणे यांनी नारायण राणेंना मिठी मारली होती.

चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही भारतीय वैज्ञानिकांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद होती. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो प्रमुख के. सिवन यांचे कौतुक करत होते. मात्र याचवेळी के. सिवन भावूक झाले होते व त्यांना अश्रु अनावर झाले होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी त्यांना जवळ घेत मिठी मारत धीर देण्याचा प्रयत्न केला होता.

बहिण- भावाच नातं असले तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा वाद अनेकवेळा चव्हाट्यावर आले आहेत. अनेकवेळा आजूबाजूने जाताना एकमेकांकडे न पाहणारे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी '2018 मधील लोकमत ऑफ द इयर' कार्यक्रमात एकमेकांची गळाभेट घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. तसेच राज्यात ठाकरे व पवार कुटुंब नेहमी एकमेकांच्या मदतीला धावून आल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जेव्हा शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शपथ घेण्यासाठी विधानभवानात दाखल झाले होते. तेव्हा सुप्रिया सुळे सर्व आमदारांचे स्वागत करण्यासाठी गेट जवळ उभ्या होत्या. याचवेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंचे विधानभवनात आगमन झाले तेव्हा सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरेंसोबत गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे अनेकदा मतभेद चव्हाट्यावर येत होते. मात्र याचवेळी उदनराजे व शिवेंद्रराजे यांनी घेतलेल्या एकमेकांच्या गळाभेटीने राज्यातील नेत्यांसह जनतेला आर्श्चयाचा धक्का बसला होता.

2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत अमित शहा यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या अहमदाबादमधील रोड शो आणि मोर्चात उद्धव ठाकरे हजेरी लावली होती. यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांची गळाभेट घेतली होती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला होता. परंतु सत्तास्थापनेसाठी भाजपाच्या येडियुरप्पा आणि जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे दावा केला होता. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला काँग्रेसनं पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसच्या या युतीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यानंतर कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात देशातील भाजपाविरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते एकत्र आले होते. त्यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मायावतींनी एकमेकांना आलिंगन दिलं होतं.

बिहारचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख नितेश कुमार आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांना राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायाचे. मात्र जेव्हा नितेश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी निवडणुकीच्या दरम्यान एकमेकांना मिठी मारल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.