कधीकाळी अभिनेत्री तब्बूच्या साड्या प्रेस करत होता रोहित शेट्टी, स्पॉटबॉट म्हणूनही केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 03:35 PM2021-12-25T15:35:01+5:302021-12-25T15:45:55+5:30

Rohit Shetty : रोहित शेट्टीने त्याच्या करिअरची सुरूवात १९९१ मध्ये आलेल्या अजय देवगनच्या सिनेमातून केली होती. या सिनेमासाठी रोहित शेट्टीने Assistant Director चं काम केलं होतं

बॉलिवूडमध्ये असे अनेक मोठे स्टार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत. ज्यांनी मोठा स्ट्रगल केला. मग तो नवाजुद्दीन सिद्दीकी असो किंवा पंकज त्रिपाठी. बॉलिवूडमधील काही लोकांच्या स्ट्रगलचा इतिहास जर पाहिला तर त्यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याचं. रोहित शेट्टीला सुरूवातीला तब्बूची साडी सुद्धा इस्त्री करावी लागली होती.

रोहिच शेट्टी आज बॉलिवूडमधील टॉपचा दिग्दर्शक आहे. त्याने जवळपास सगळ्याच मोठ्या स्टार्ससोबत सिनेमे केले आहेत. रोहितने सूर्यंवंशी, सिंबा, सिंघम, गोलमाल, गोलमाल रिटर्न, चेन्नई एक्सप्रेस सारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टीने त्याच्या करिअरची सुरूवात १९९१ मध्ये आलेल्या अजय देवगनच्या सिनेमातून केली होती. या सिनेमासाठी रोहित शेट्टीने Assistant Director चं काम केलं होतं. नंतर त्याने अजय देवगनसोबत अनेक सिनेमे केले. असं म्हणतात की त्यावेळी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याने हार मानली नाही.

अनेकांना माहीत नसेल की, रोहित शेट्टी बॉलिवूडचे जुने अभिनेते M.B.Shetty यांचा मुलगा आहे. M.B.Shetty बॉलिवूडचे अॅक्शन दिग्दर्शक होते. वडिलांचं निधन झालं तेव्हा रोहित लहान होता. घरची परिस्थिती बिघडू लागली होती. रोहितच्या आईला सिनेमात ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून काम करावं लागलं होतं.

असं म्हणतात की, परिस्थिती इतकी बिघडली होती की, त्याला त्याचं घरही विकावं लागलं होतं. त्यानंतर तो त्याच्या आईसोबत आजीकडे रहायला गेला होता. त्याची आजी दहीसरमध्ये राहत होती. रोहितची शाळा सांताक्रूझमध्ये होती. तो इतका प्रवास करत येत होता. पुढे जाऊन त्याला शिक्षणापेक्षा जास्त कमाई गरज पडली.

असं सांगितलं जातं की, त्यावेळी रोहिती बहीण चंदा दिग्दर्शक राहुल रवैलसोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होती. राहुल रवैलसोबत दिग्दर्शक कुक्कू कोहलीचं उठणं बसणं होतं. मग काय चंदाने भाऊ रोहितबाबत कुक्कू कोहलीकडे शब्द टाकला. पण त्यावेळी त्यांना लक्ष दिलं नाही. पण काही दिवसांनी त्यांनी रोहितला काम दिलं. त्यावेळी कुक्कू कोहली फूल और कांटे सिनेमा करत होते. या सिनेमासाठी रोहितने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं.

Mid-day च्या एका रिपोर्टनुसार, रोहित शेट्टीने १९९५ मध्ये तब्बूचा सिनेमा 'हकीकत'वेळी स्पॉटबॉयचं काम केलं होतं. त्यावेळी तो तब्बूच्या साडींना इस्त्री करत होता. त्याशिवाय त्याने काजोलसाठीही स्पॉटबॉयचं काम केलं होतं. रोहित काजोलच्या केसांना टचअप करत होता.