Sakshi Maharaj : "यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 09:17 IST2024-06-20T09:09:55+5:302024-06-20T09:17:49+5:30
Sakshi Maharaj And Narendra Modi : भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sakshi Maharaj : "यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट"
उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ नयेत यासाठी विदेशी शक्तींनी पैसे लावले होते असं म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी चर्चा केली आणि गृहमंत्र्यांना उत्तर प्रदेशातील निवडणुकीत परकीय शक्तींनी गुंतवलेल्या पैशाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. हे सर्व एका षड्यंत्राखाली करण्यात आल्याचं देखील म्हटलं आहे.
साक्षी महाराज म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य टार्गेट होते कारण पंतप्रधानांच्या खुर्चीचा मार्ग यूपीमधून जातो. विदेशी शक्ती कोण आहे?, पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधत यूपीमध्ये विदेशी गुंतवणूक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत मी ७० हजार मतांनी मागे पडलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी विदेशी शक्तींची इच्छा नव्हती."
"उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालांचा आढावा घेतला जावा आणि यासंदर्भात मी पंतप्रधानांना वैयक्तिक विनंतीही केली आहे. मोदीजी म्हणाले, विकास हा सुद्धा एक वारसा होता. मला वाटतं फक्त बाबरचं नाव नाही तर अशी शेकडो नावं आहेत जी काढून टाकली पाहिजेत. आपल्या संस्कृतीचा आणि आपला अपमान करण्यासाठी ही नावं ठेवली गेली होती, मग ती शहरांची नावं असोत, रस्त्यांची नावं असोत. मला वाटतं की अकबर शिक्षण क्षेत्रात महान आहे" असंही साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.
साक्षी महाराज यांचे हरिद्वारमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. श्री निर्मल पंचायती आखाडा येथे संतांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आणि निर्मल पंचायती आखाडा येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेने ठराव मंजूर करून साक्षी महाराज यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री बनवण्याची मागणी केली आहे.