Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:47 IST2026-01-03T12:46:14+5:302026-01-03T12:47:13+5:30
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपत गटबाजीमुळे अक्षरशः चिखल झाला असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये दोन कमळ असेच रुतल्याने तेथे पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही त्यांना पक्ष चिन्ह मिळाले नाही.

Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?
नाशिक : महापालिका निवडणुकीत भाजपत गटबाजीमुळे अक्षरशः चिखल झाला असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये दोन कमळ असेच रुतल्याने तेथे पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही त्यांना पक्ष चिन्ह मिळाले नाही. परिणामी या दोन्ही उमेदवारांना पुरस्कृत करण्याची वेळ भाजपवर आली आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणूक इतिहासात प्रथमच भाजपवर अशाप्रकारची नामुष्की आली आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर हे भाजपने नंतर घोषित केलेले अधिकृत उमेदवार आता अपक्ष ठरल्याने खास सुधाकर बडगुजर यांच्याशी केलेल्या तडजोडीत त्यांना पुरस्कृत करावे लागले आहे.
गेल्यावेळी भाजपला महापालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्याने आताही त्यापेक्षा अधिक निर्विवाद यश मिळेलच अशी खात्री बाळगणाऱ्या भाजपने सुरुवातीपासून शंभर प्लसची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपकडे इच्छुकांची संख्या वाढत गेल्यानंतर युतीची बोलणी देखील मध्येच थांबली. त्यानंतर भाजपने उमेदवारीसाठी मुलाखती घेतल्यानंतर इच्छुकांची संख्या इतकी वाढली की, एची फॉर्म वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ उडाला. हे प्रकरण हाताघाईपर्यंत गेल्याचे समजते.
सिडकोत विशेषतः प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मध्ये परस्पर एबी फॉर्म देण्यात आल्याचे उघडकीस आले. उध्दवसेनेतून भाजपत दाखल झालेले नेते सुधाकर बडगुजर यांनी ज्यांना अर्ज वाटप दिले त्यांच्या कुटुंबासह सर्वांनीच ते दाखल केले. त्यानंतर पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले, ते तांत्रिकदृष्ट्या विलंबाने दाखल झाल्याने बाद झाले. भाजपने एकूण ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र, दुहेरी एबी फॉर्मचा फटका छाननीच्या वेळी बसला आणि सिडको विभागातच भाजपचे चार अधिकृत एबी फॉर्म बाद झाले. आता माघारीच्या अखेरच्या दिवसानंतर बऱ्यापैकी रंगतीचे चित्र स्पष्ट झाले आहेत. भाजपला दोन जागांवर आपले उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे.
पक्ष नेत्यांच्या सूचनेनुसार सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील प्रकाश अमृतकर आणि भाग्यश्री ढोमसे या दोन उमेदवारांना भाजपच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले आहे.
- सुनील केदार, शहराध्यक्ष भाजप
अन्य उमेदवाराची माघार
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊनही अपक्ष म्हणून लढण्याची वेळ आलेल्या सविता पाटील यांनी मात्र माघार घेतली आहे.
का घडले असे ?
सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मधील उमेदवारीचा गुंता वाढला होता. प्रभाग क्रमांक २५ मध्ये सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, दीपक बडगुजर आणि साधना पवन मटाले यांना उमेदवारी अर्ज म्हणजे एबी फॉर्म देण्यात आले. त्यानंतर हर्षा बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी या प्रभागातून माघार घेतली. त्यामुळे आता प्रभागात पक्षाने उशिराने उमेदवारी दिलेल्या भाग्यश्री ढोमसे यांना, तर बडगुजर समर्थक अपक्ष प्रकाश अमृतकर यांना पक्षाने पुरस्कृत करण्यात आले आहे.