...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:38 AM2024-04-11T07:38:48+5:302024-04-11T07:39:20+5:30

पंतप्रधान मोदींचा सवाल : विराेधक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत

...so why Congress did not implement the constitution equally in the country?; Modi's question | ...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

योगेश पांडे/जितेंद्र ढवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान (जि. नागपूर) : एनडीएला देशात चारशे जागा मिळाल्या तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार कॉंग्रेस व विरोधकांकडून केला जात आहे. मात्र ६० वर्षे कॉंग्रेसने आंबेडकरांनी दिलेले संविधान समानपणे लागू का केले नाही, असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. रामटेक मतदारसंघातील कन्हान येथे बुधवारी आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

कन्हानमधील ब्रुक बाँड मैदानात आयोजित या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री व भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

मी राजकारणात आलो तेव्हापासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी संविधानाचाच मुद्दा आणला. यातूनच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येत आहे. हे लोक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत. आणीबाणीच्या वेळी देशातील लोकशाही धोक्यात आली नव्हती का आणि गरीबाचा मुलगा सत्तेत आल्यावरच त्यांना संविधानावर संकट आले असल्याचे दिसले का असा सवाल त्यांनी केला. 

विरोधकांना शक्ती मिळाली तर देशाला खंडित करतील
इंडी आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशातील लोकांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता एकजूट झाली तर त्यांचे राजकारण संपेल, याची त्यांना जाण आहे. विरोधकांना शक्ती मिळाली, तर ते देशाला खंडित करतील. विरोधक सनातनवर हल्ला करत असून, हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करू इच्छितात, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपविले
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने षडयंत्र करून सातत्याने एससी, एसटी, ओबीसी समाजाला विकासापासून दूर ठेवले. अगदी बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारणदेखील संपविले व त्यांना भारतरत्नपासून वंचित ठेवले. विरोधक सीएएचा विरोध करत आहेत. कारण, याचे सर्वांत मोठे लाभार्थी बौद्ध, दलित आहेत, असा दावा पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी पूर्ण ऐकले गडकरी, मुख्यमंत्र्यांचे भाषण
सर्वसाधारणत: पंतप्रधानांच्या सभेमध्ये त्यांचे आगमन झाल्यावर स्वागत झाल्यानंतर थेट त्यांच्या भाषणाला सुरुवात होते. मात्र कन्हानच्या सभेत पंतप्रधानांनी नितीन गडकरी व मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण ऐकले व त्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली. यामुळे मंचावरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

काय म्हणाले मोदी...
n१९ एप्रिलला तुम्हाला केवळ खासदार निवडायचा नाही; तर पुढील हजार वर्षांच्या भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. 
nजेव्हा विरोधक मला किंवा माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ करतात, तेव्हा आमचे सरकार येणार हे समजून घ्या.
nरालोआ सरकारने सर्वाधिक ओबीसी मंत्री देशाला दिले.
nकाँग्रेसने जाणूनबुजून संपूर्ण देशात बाबासाहेबांचे संविधान लागू होऊ दिले नव्हते.
nकाश्मीरमधून कलम ३७० हटल्यानंतर तेथील एससी, एसटी यांना हक्क मिळाले.
nरामायण व बुद्धिस्ट सर्किटमुळे पर्यटनाचा विस्तार होईल.

Web Title: ...so why Congress did not implement the constitution equally in the country?; Modi's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.