Maharashtra Vidhan Sabha 2019: Will Ashish Deshmukh who quit MLA from BJP and join Congress be rehabilitated? | Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

कमलेश वानखेडे

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नाना पटोले यांनी खासदारकीचा व आशिष देशमुख यांनीही काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपाही सोडली. पुढे पटोले यांना काँग्रेसने नागपूर लोकसभेची उमेदवारी देऊ केली. मात्र, आता आशिष देशमुख यांना विधानसभेचे तिकीट देऊन त्यांचे पुनर्वसन होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी मतदारसंघ बदलला व काटोलमध्ये स्वत:चे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उभे ठाकले. या निवडणुकीत पुतण्याने काकांचा पराभव केला. आशिष देशमुख आमदार झाले. मात्र, ते फार काळ भाजपमध्ये रमू शकले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून भाजपवर नेम साधण्यास सुरुवात केली. शेवटी लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ धरला. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांना ‘हात’ देईल की हात दाखवेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Image may contain: 12 people, people smiling, crowd

आशिष देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत नागपुरातून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी दिल्ली दरबारी बरेच प्रयत्न केले. पण नाना पटोले यांनी हात मारला. आता देशमुख यांच्यासाठी जिल्ह्यात तसा कुठलाही मतदारसंघ नाही. मात्र, मिळेल त्या मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना तिकीट मिळेलच याची खात्री नाही. शिवाय आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून जो तो भाजपकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशमुख यांनी भाजपची आमदारकी सोडून चूक तर केली नाही ना, अशी चर्चा आता त्यांच्या समर्थकांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पुन्हा भाजपवासी होण्याचे त्यांचे सारेच रस्ते बंद झाले आहेत.

Image may contain: one or more people and crowd

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Will Ashish Deshmukh who quit MLA from BJP and join Congress be rehabilitated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.