Sher Shivraj Movie Review: शिवरायांनी केलेला अफझलखानाचा वध म्हणजे 'माईंड गेम'च, जाणून घ्या 'शेर शिवराज'बद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:59 PM2022-04-21T15:59:26+5:302022-04-21T16:00:33+5:30

Sher Shivraj Movie Review: पुनश्च शिवराय असं म्हणत दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि त्याच्या टिमनं शिवराज अष्टक या सिनेमालिकेतील चौथं पुष्प 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या रूपात सादर केलं आहे.

Sher Shivraj Movie Review: Afzal Khan's 'Mind Game', Learn About 'Sher Shivraj' | Sher Shivraj Movie Review: शिवरायांनी केलेला अफझलखानाचा वध म्हणजे 'माईंड गेम'च, जाणून घ्या 'शेर शिवराज'बद्दल

Sher Shivraj Movie Review: शिवरायांनी केलेला अफझलखानाचा वध म्हणजे 'माईंड गेम'च, जाणून घ्या 'शेर शिवराज'बद्दल

googlenewsNext

कलाकार : चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मुकेश ऋषी, दिग्पाल लांजेकर, दिप्ती केतकर, वैभव मांगले, मृण्मयी देशपांडे, सुश्रुत मंकणी, रविंद्र मंकणी, रिशी सक्सेना, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, निखील लांजेकर, अक्षय वाघमारे, वर्षा उसगांवकर 
लेखक - दिग्दर्शक - दिगपाल लांजेकर
कालावधी : २ तास ३३ मिनिटे
दर्जा : चार स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे


पुनश्च शिवराय असं म्हणत दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि त्याच्या टीमनं शिवराज अष्टक या सिनेमालिकेतील चौथं पुष्प 'शेर शिवराज' (Sher Shivraj Movie) या चित्रपटाच्या रूपात सादर केलं आहे. या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासातील सुवर्ण अध्याय आजच्या पिढीसमोर आला आहे. अफझलखानाचा वध हा केवळ एका बलाढ्य शत्रूवर मिळवलेला विजय नव्हता, तर शत्रूचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून अचूक गनिमी काव्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा एक प्रकारे केलेला माईंड गेमच होता. आज जगभरातील सैन्यांच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचा घटक असणारा अफझलखान वध 'शेर शिवराज'मध्ये पहायला मिळतो. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकरनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे अभिमानानं उर भरून यावा असा पराक्रम गाजवणाऱ्या मर्द आणि स्त्री मावळ्यांचा जणू गौरवच आहे. पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांच्यासह दिग्पाल आणि मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी सुरेख अभिनय केला आहे.

आदिलशाही दरबारात बडी बेगम शहाजी महाराजांना त्यांच्या पुत्राच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या बंडखोरीबाबत जाब विचारते, तेव्हा शिवबाची वाट अडवू शकणारा योद्धा दरबारात असेल तर खुशाल तसा प्रयत्न करा असे ते सांगतात. त्यावर क्रूरकर्मा, देवद्वेष्टा, कपटी, दगाबाज, निष्ठूर अफझलखान भर दरबारात शिवाजी महाराजांचा खात्मा करण्याचा विडा उचलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या संरक्षणासाठी स्थापन केलेलं स्वराज्य उद्ध्वस्त करण्याचा त्याचा मनसुबा असतो. ३५ हजार सैन्य, ८५ हत्ती, १२०० तोफा आणि हजारोंचं घोडदळ घेऊन शिवरायांना जेरबंद करण्यासाठी खान स्वराज्यावर चाल करून येतो. मजल दरमजल करत, देवळं फोडत, रयतेचा अमानुष छळ करत, आयाबहिणींवर अत्याचार करत स्वराज्याच्या दिशेनं येणाऱ्या खानाला नमवण्यासाठी शिवराय कोणती युद्धनीती अवलंबतात आणि कसा त्याचा कोथळा बाहेर काढून स्वराज्याचं रक्षण करतात ते यात आहे.

अफझलखानवधाचा इतिहास सर्वांना माहीत असला तरी, चित्रपटरूपात पडद्यावर पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे. खानवधाच्या पार्श्वभूमीसह सादर करण्यात आलेली पटकथा, अंगावर रोमांच आणणारे संवाद, काही भावनिक दृश्ये आणि प्रत्यक्ष खानवधाचा प्रसंग पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा घुमवण्यासाठी पुरेसा आहे. पटकथेची मुद्देसूद मांडणी आणि त्याच तोलामोलाचं दिग्दर्शन दिग्पालनं केलं आहे. प्रत्येक कॅरेक्टर ठळकपणे सादर करताना अत्यंत लहानसहान गोष्टींचा विचार केला आहे. शिवरायांच्या एन्ट्रीसह प्रत्येक लढवय्या मावळ्याची ओळख खूप छान करून देण्यात आली आहे. खान मोहम्मदच्या हत्येचा सीन हा जणू शिवरायांचा खात्मा करण्यासाठी खान कोणती पद्धत वापरणार होता याचा ट्रेलर दाखवणारा आहे. शत्रूला जेरीस आणून, त्याच्या संयमाचा बांध फुटेपर्यंत मेटाकुटीस आणून, बाह्यशक्तीसोबतच शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर शत्रूचा अभ्यास करून अचूक रणनीतीचा वापर शिवरायांनी कसा केला हे चांगल्या प्रकारे दाखवलं आहे. विजापूरहून निघालेला खान कोणत्या वाटेनं आपल्यापर्यंत येणार आहे, त्याची पुढची रणनीती काय असणार आहे, तो कधी पहिला वार करणार आहे, त्याचा मनसुबा काय आहे याचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करून त्याला नमवण्यासाठी शिवरायांनी केलेल्या लहानातील लहान कृतीचं दर्शन यात घडवण्यात आलं आहे. खानाच्या दिनचर्येपासून ते त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयीपर्यंत सर्व गोष्टींचा अभ्यास शिवरायांनी केला होता. आपण घाबरलो असल्याचं भासवून खानाला गाफील ठेवून, त्याचं पित्त खवळेल अशी कृती करून, मत्सर जागृत होईल असं दृश्य दाखवून, संयमाचा बांध फुटेपर्यंत वाट पहायला लावून, सैन्यापासून दूर आणून खानाचा केलेला माईंड गेम पहाणं म्हणजे एक रोमांचक अनुभवच आहे.

'शिवबा राजं...' हे गाणं छान झालंय, पण कथेच्या प्रवाहात थोडा व्यत्यय निर्माण करणारं वाटतं. सईबाईंच्या आजारपणाच्या दृश्यात बराच वेळ गेलाय. तो कमी करून गती वाढवता आली असती. या दृश्यातील शिवराय आणि सईबाईंमधील संवाद थोडे खटकतात. कलादिग्दर्शन, पार्श्वसंगीत, संगीत, कॅास्च्युम या विभागांनी आपली कामागिरी चोख बजावली आहे. देवदत्त बाजीचं संगीत श्रवणीय आहे. 'येळकोट देवाचा...', 'शिवबा राजं...' ही गाणी चांगली आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा छान वापर केला आहे. शिवराज अष्टकातील हा चौथा चित्रपट असल्यानं ही पूर्वार्धाची समाप्ती असून, उत्तरार्धाच्या प्रारंभी शिवराय दिल्लीवर स्वारी करायला निघणार असल्याचे संकेत अखेरीस देण्यात आले आहेत.

चौथ्यांदा चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जीव ओतून वठवली आहे. चिन्मयच्या नसानसात शिवराय भिनल्याचं पडद्यावर पाहताना जाणवतं. तह न करता थेट खानाचा खात्मा करण्यासाठी शिवरायांना प्रोत्साहित करणाऱ्या राजमाता जिजाऊ पुन्हा एकदा मृणाल कुलकर्णींनी अफलातून साकारल्या आहेत. मुकेश ऋषीच्या रूपातील खान मनाचा थरकाप उडवणारा व चीड आणणारा आहे. मातोश्री दिपाईआऊ बांदल यांच्या व्यक्तिरेखेत दीप्ती केतकरनं झुंझार स्त्रीचं दर्शन घडवलं आहे. वैभव मांगलेनं काहीसा विनोदी, पण मुत्सद्दी गोपीनाथ बोकील सुरेख रंगवलाय. दिग्पाल लांजेकरने साकारलेले बहिर्जी नाईकही झकास आहेत. केसरच्या रूपात पुन्हा मृण्मयी देशपांडेनं छाप सोडली आहे. बडी बेगमच्या भूमिकेत वर्षा उसगावकरचं नवं रूप पहायला मिळतं. सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पूरकरनं चांगलं काम केलं असलं, तरी 'पावनखिंड'मध्ये बाजी प्रभूंची अजरामर व्यक्तिरेखा जगल्यानंतर त्यानं ही भूमिका करणं योग्य होतं का, हा प्रश्न पडतो. समीर धर्माधिकारीनं साकारलेले श्रीमंत कान्होजीराजे जेधेही चांगले जमून आलेत.  ज्ञानेश वाडेकर, ईशा केसकर, माधवी निमकर, विक्रम गायकवाड, हरीश कोंडल, मंदार परळीकर, रविंद्र मंकणी, रिशी सक्सेना, दिपक मांडलिक, सचिन  देशपांडे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे, आस्ताद काळे, निखील लांजेकर, अक्षय वाघमारे या सर्वांनीच आपापल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय दिला आहे. हा केवळ खानाचा वध न दाखवता त्याला कोंडीत पकडण्यासाठी शिवरायांनी आखलेल्या रणनीतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट म्हणजे मावळ्यांच्या साथीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या महापराक्रमाची गाथा असल्यानं सर्वांनी अवश्य पाहायला हवा.

Web Title: Sher Shivraj Movie Review: Afzal Khan's 'Mind Game', Learn About 'Sher Shivraj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.