उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:35 IST2026-04-21T13:34:35+5:302026-04-21T13:35:17+5:30
मुंबई क्षेत्रातील ग्रिडच्या मजबुतीसाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे.

उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण: मुंबई क्षेत्रातील ग्रिडच्या मजबुतीसाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मात्र प्रस्तावित प्रकल्पाला गॅस पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने मंजुरीच दिली नसल्याने प्रकल्प चार वर्षांपासून रखडला आहे.
सुमारे ४० वर्षांपासून उरण वायू विद्युत केंद्र अखंड सेवा देत आहे. या ६७० वीजनिर्मिती क्षमतेच्या प्रकल्पातून ३५० हून अधिक मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. ही वीज केंद्रातून प्रतियुनिट १.७६ रुपये इतक्या रास्त दरात राज्याला उपलब्ध होत आहे. मुंबईत पीक टाइमला सध्या विजेची गरज २५०० ते ३००० मेगावॅट असते. २०३० सालापर्यंत विजेची गरज ५ हजार मेगावॅटपर्यंत असणार आहे.
उरणमध्ये पुरेशी जमीन
वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासह उपाययोजनेसाठी २२ आक्टोबर २०२० रोजी माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उरणच्या वायू विद्युत प्रकल्पाची पाहणी केली होती. उरण येथे पुरेशी जमीन, पाणी व अन्य संसाधने उपलब्ध असल्याने आणखी इंधन वायू उपलब्ध करण्यासाठी संबंधित यंत्रणाशी संपर्क साधून प्रयत्न केल्यास येथून वीज तत्काळ उपलब्ध होऊ शकते. वाढीव विजेतून ग्राहकांचे हित साध्य होऊ शकते. या दृष्टिकोनातून डॉ. राऊत यांनी उरण येथे एक हजार मेगावॅटचा प्रकल्प उभा करण्याची गरज असल्याचे सांगत महाजनको कंपनीला अहवाल देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.
२०२२ मध्ये ठरावही मंजूर
- ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई क्षेत्रातील ग्रिडच्या मजबुतीसाठी महानिर्मितीने उरण वायू विद्युत केंद्रातील जागेत बदली प्रकल्पाद्वारे वीज क्षमतावाढ प्रस्तावित करण्याचा निर्णय झाला. यासाठी महानिर्मितीच्या संचालक मंडळाने १६ मार्च २०२२ रोजी प्रकल्प उभारण्यासाठी ठरावही मंजूर केला.
- उरण येथील जुन्या संचांच्या बदली, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उच्च कार्यक्षमतेच्या एफ क्लासच्या दोन गॅस टर्बाईनसहित सुमारे ८५० मेगावॅट एकत्रित क्षमता असलेल्या सीसीपीपी संचाचा व्यवहार्यता अहवाल आणि विस्तृत प्रकल्प अहवाल आदी बाबींनाही मंडळाने मान्यता दिली आहे.
- प्रकल्पासाठी लागणाऱ्या एटीएम वायू इंधनाच्या उपलब्धतेसाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे चार वर्षांपूर्वी पत्रव्यवहारही केला. याबाबत पाठपुरावा करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.