काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 09:31 PM2024-11-30T21:31:55+5:302024-11-30T21:33:54+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले, त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेल्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मात्र दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस समोर येताना दिसत आहे. पराभूत झालेले उमेदवार पक्षातील नेत्यांवर दोषारोप करताना दिसत आहेत. परंतु, याबाबत आता काँग्रेसने कठोर भूमिका घेतली असून, बेशिस्त वर्तन करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर काँग्रेस कारवाई करणार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप करून पक्षशिस्तीला काळीमा फासला असून, त्यांना निलंबित का करू नये, यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर टिळक भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांबाबत खोटी व बदनामी करणारी विधाने केली आहेत. काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची प्रतिमा मलिन करणा-यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
बंटी शेळके यांनी काय आरोप केलेत?
पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSS चे एजंट आहेत. राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्याने मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आली. हे नाना पटोले यांना पटले नाही. प्रचारात संघटनेची मदत झाली नाही. पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी नेत्यांना पाठवले नाही. ते स्वतः ही प्रचारासाठी आले नाही. कुठलीही मदत केली नाही, अशी टीका बंटी शेळके यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून दिले. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होते त्या पद्धतीने लढले नाही, आम्हाला पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. जालना मतदारसंघात काँग्रेसच्याच काही लोकांनी गद्दारी केली. काँग्रेसने एकही सभा घेतली नाही. जी काही सामग्री द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, या शब्दांत आरोप करत कैलास गोरंट्याल यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. जालना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना पराभवाचा धक्का बसला.