एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:50 IST2025-05-02T16:48:35+5:302025-05-02T16:50:12+5:30
या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.

एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
उल्लू अॅपवरील अभिनेता एजाज खानचा शो ‘हाउस अरेस्ट’ अश्लिल कंटेन्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शो मधील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राज्य महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.
हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे -
यासंदर्भात, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपीली चाकणकर यांनी, पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे. यात, "उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शोमध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत, महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे," असे म्हणण्यात आले आहे.
याशिवाय, "हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई व्हावी." अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला,पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत,महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून… pic.twitter.com/bxRakWmEeF
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 2, 2025
राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना समन्स पाठवले आहेत. दोघांनाही 9 मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्सनुसार, 29 एप्रिल 2025 रोजी शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली. यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना विचित्र प्रश्न विचारताना आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील पोझ देण्यास सांगताना दिसतोय.
आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कठोर शब्दात सांगितले की, महिलांविरुद्ध असलेली, त्यांच्या संमतीकडे दुर्लक्ष करणारी किंवा अश्लीलता पसरवणारा कोणत्याही प्रकारचा कंटेट खपवून घेतला जाणार नाही.
उल्लू अॅपने सर्व एपिसोड काढले
या शोचे क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. उल्लू अॅपवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप होत आहे. सामान्यांपासून ते अनेक राजकीय व्यक्तींनीही या शोवर निशाणा साधला आणि याला बंद करण्याची मागणी केली. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्म Ullu अॅपने हाऊस अरेस्ट शोचे सर्व एपिसोड काढून टाकले आहेत. तसेच, एजाज खानविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे.