जालियनवाला बाग हत्याकांडामागील राजकारण आणि कारस्थानं उघड करणाऱ्या 'द वेकींग ऑफ अ नेशन'चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:59 IST2025-02-11T16:59:06+5:302025-02-11T16:59:54+5:30
'द वेकींग ऑफ अ नेशन' वेबसीरिजचा टीझर रिलीज झालाय. या टीझरमधून आजवर न ऐकली गेलेली कहाणी बघायला मिळणार आहे

जालियनवाला बाग हत्याकांडामागील राजकारण आणि कारस्थानं उघड करणाऱ्या 'द वेकींग ऑफ अ नेशन'चा टीझर रिलीज
'द वेकिंग ऑफ अ नेशन' (the waking of a nation) या आगामी वेबसीरिजचा टीझर नुकताच भेटीला आलाय. या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासातील फारशा माहीत नसलेल्या एका प्रकरणावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते तसेच इंटनॅशनल एमी पुरस्कारांसाठी नामांकन प्राप्त करणारे फिल्ममेकर राम माधवानी यांनी या सीरिजची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. भारतीय इतिहासातील जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणावर ही वेबसीरिज आधारीत आहे.
काय असणार 'द वेकिंग ऑफ अ नेशन'ची कहाणी?
'द वेकिंग ऑफ अ नेशन' वेबसीरिजमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, वसाहतवादी फसवणुकीच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या कांतिलाल साहनी या वकिलाची ही कथा आहे. तारुक रैना हा अभिनेता कांतिलाल साहनीच्या भूमिकेत आहे. सत्ताधारी साम्राज्याची तळी उचलण्यासाठी हंटर आयोग इतिहासाचा विपर्यास करत असतानाच, कांतिलाल वर्णभेद, इतिहास खोडून टाकणे यांच्याविरोधात झुंज देतो आणि सत्याची बाजू लावून धरतो. कांतीलाल आणि त्याचे सहकारी भवितव्य बदलू शकणारे एक कारस्थान उघड करतात. याचीच थरारक कहाणी 'द वेकिंग ऑफ अ नेशन'मध्ये बघायला मिळणार आहे.
कलाकार कोण आणि कुठे पाहता येईल?
राम माधवानी आणि अमिता माधवानी यांनी राम माधवानी फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण केलेल्या 'द वेकिंग ऑफ अ नेशन' या वेबसीरिजमध्ये दमदार कलावंत आहेत. तारूक रैना, निकिता दत्ता, साहिल मेहता, भावशील सिंग, अॅलेक्स रिकी आणि पॉल मॅकएवान यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. शंतनू श्रीवास्तव, शत्रुजीत नाथ आणि राम माधवानी यांनी या शोचे लेखन केले आहे. ‘द वेकिंग ऑफ अ नेशन’ वेबसीरिज सोनी लिव्हवर ७ मार्चपासून पाहायला मिळेल.