'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 23:18 IST2025-08-15T23:14:43+5:302025-08-15T23:18:14+5:30
Pratik Gandhi : प्रतीकने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीवरून केली होती. गुजराती भाषेत अनेक नाटकं केल्यानंतर, त्याने आपला मोर्चा बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीकडे वळवला.

'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला...
Pratik Gandhi At Malhar 2025 : बॉलिवूड अभिनेता प्रतीक गांधी याला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. 'गांधी', 'फुले', 'स्कॅम १९९२', 'सारे जहाँ से अच्छा' यासारखे दमदार प्रोजेक्ट करून प्रतीकने चाहत्यांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आता जरी सगळेच प्रतीकला त्याच्या चेहऱ्याने ओळखत असले, तरी एक वेळ अशी होती जेव्हा त्याचा चेहरा अनेक नकारांचे कारण ठरला होता.
नुकतीच 'सेंट झेवियर्स' कॉलेजच्या 'मल्हार २०२५'या मंचावर नेटफ्लिक्सच्या 'सारे जहाँ से अच्छा' या सीरिजच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता प्रतीक गांधी याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी होती, यावर भाष्य केलं. प्रतीक म्हणाला की, "आता काम मिळवणं आधीच्या तुलनेनं सोपं वाटतं. आजही अनेक ऑडिशन्स द्यायला लागतात. मात्र एक काळ असा होता, जेव्हा ऑडिशन देऊनही काम मिळत नव्हतं."
'हा' विचार करून मुंबईत आला!
प्रतीकने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीवरून केली होती. गुजराती भाषेत अनेक नाटकं केल्यानंतर, त्याने आपला मोर्चा बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीकडे वळवला. २०००च्या काळात अनेक मालिका टीव्हीवर येत होत्या. मालिका विश्वात अनेक बदल होत होते. एकाच मालिकेत अनेक कलाकारांना चमकण्याची संधी मिळत होती. अगदी लहान भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या होत्या. त्यामुळे आपणही मुंबईत जाऊन आपलं नशीब आजमावून बघावं, इतक्या लोकांना काम मिळतं, तर आपल्यालाही नक्की मिळेल, आपल्याकडे रंगभूमीचा चांगला अनुभव देखील आहे, असा विचार करून प्रतीक मुंबईत आला होता.
अनेकदा नकार मिळाला, कारण...
सुरुवातीला त्याने ऑडिशनसाठी अनेक स्टुडिओजमध्ये चकरा मारायला सुरुवात केली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्याच्या पदरी निराशाच पडत होती. या काळात त्याने अनेकदा नकार पचवला. या नकाराचं कारण ठरला तो त्याचा चेहरा! 'तुझा चेहरा एखाद्या हिरोसारखा नाही. तू जन्मजात श्रीमंत वाटतच नाहीस, मग तुला मुख्य अभिनेता म्हणून कसं काय घ्यायचं?', असं म्हणत अनेकांनी त्याला नकार दिला होता.
प्रतीक म्हणला की, 'अभिनयाचं कोणतच ऑडिशन न घेता केवळ चेहरा बघून नकार मिळाल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. सुरुवातीच्या काळात मुख्य अभिनेता म्हणजे वडिलांची श्रीमंती, जन्मापासूनच तोंडात सोन्याचा चमचा, गोरा गोमटा आणि पिळदार शरीरयष्टी असणारा पुरुष, अशी लोकांची संकल्पना होती. मात्र, काबाडकष्ट करून पुढे आलेला 'हिरो' कुणालाच नको होता."
ओटीटी मंच म्हणजे नवीन संधी!
मात्र, ओटीटीने सगळ्यांना स्वीकारलं. चेहऱ्यापेक्षा अभिनयाला प्राधान्य दिलं. ओटीटीमुळे नव्या चेहऱ्यांना आणि कलाकारांना चांगली संधी मिळायला लागली आहे, ही एक चांगली बाजू आहे. केवळ काल्पनिक गोष्टी न दाखवता, खऱ्या आयुष्यात काय घडतं आणि वास्तव किती कठीण आहे, हे ओटीटीवर थेट मांडण्याची संधी मिळत आहे, असे प्रतीक गांधी म्हणाला.