'एक किडे को मार दिया लेकीन..'; 'पाताल लोक २'चा टीझर रिलीज, रहस्यमयी कहाणीने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:24 IST2025-01-03T15:22:55+5:302025-01-03T15:24:28+5:30
'पाताल लोक २' चा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालाय. या टीझरने वेबसीरिजविषयी आणखी उत्सुकता निर्माण केलीय

'एक किडे को मार दिया लेकीन..'; 'पाताल लोक २'चा टीझर रिलीज, रहस्यमयी कहाणीने वेधलं लक्ष
अगदी काहीच दिवसांपूर्वी 'पाताल लोक २' वेबसीरिजचं पहिलं पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरमध्ये 'पाताल लोक २'मधील मुख्य अभिनेता जयदीप अहलावत दिसून आला. 'पाताल लोक २'च्या रिलीज डेटची घोषणाही या पोस्टरमधून करण्यात आली. अशातच बहुचर्चित 'पाताल लोक २'चा टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये हाथी राम चौधरी (जयदीप अहलावत) एक कहाणी सांगतो. ही कहाणी ऐकताच 'पाताल लोक २'मध्ये आणखी काय बघायला मिळणार, याची उत्कंठा वाढते.
'पाताल लोक २'च्या टीझरमध्ये काय
'पाताल लोक २'च्या टीझरमध्ये हाथी राम चौधरी एका लिफ्टमध्ये प्रवेश करतो. त्या लिफ्टमधील P हे बटण हाथी राम दाबताना दिसतो. लिफ्ट खाली खाली जाते. तसं हाथी राम एक कहाणी लोकांना सांगताना दिसतो. गावातील एका व्यक्तीला किड्यांचा त्रास होतो. सर्व वाईट गोष्टी या किड्यांमुळे निर्माण होतात असं तो व्यक्ती मानतो. पुढे एक किडा त्या व्यक्तीला चावतो. परंतु तो व्यक्ती धाडसाने किड्याला मारतो. त्यामुळे एका रात्रीत तो व्यक्ती गावात लोकप्रिय होतो.
गावकरी त्याला डोक्यावर बसवतात. तो व्यक्तीही पुढचे काही दिवस सुखाची झोप घेतो. एका रात्री त्याच्या बेडखालून आवाज येतो. त्याला एक किडा दिसतो. पुढे हे किडे वाढत जातात. लाख, हजार मोजता येणार नाहीत असे असंख्य किडे तिकडे दिसतात. एक किडा मारला म्हणजे सर्व संपलं असं पाताल लोकमध्ये होत नाही. असं म्हणत हाथी राम चौधरी कहाणी संपवतो. 'पाताल लोक २'चा नवीन सीझन १७ जानेवारी २०२५ ला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.