"नागराज भावा, तू माझ्यावर विश्वास टाकलास...", सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:43 IST2026-04-17T09:43:01+5:302026-04-17T09:43:32+5:30
नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ जाधव 'या' भूमिकेत

"नागराज भावा, तू माझ्यावर विश्वास टाकलास...", सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या विनोदी शैलीमुळे सर्वांना हसवतो. एकापेक्षा एक मराठी सिनेमांमधून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. इतकंच नाही तर हिंदीतही सिद्धार्थ जाधव हे नाव चर्चेत असतं. रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये तो दिसला. तर आता नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये तो झळकला आहे. ही सिद्धार्थची पहिलीच हिंदी वेबसीरिज असून त्याने नागराज मंजुळेचे आभार मानत खास पोस्ट लिहिली आहे.
'शुक्रिया सेठ ...काम देने के लिए नही...भरोसा रखने के लिये'
सिद्धार्थ जाधवने 'मटका किंग'च्या सेटवरील फोटो पोस्ट करत लिहिले, "नागराज मंजुळे भावा...तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक नटाची असते. आज 'मटका किंग'च्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली. माझ्या आयुष्यातली पहिली वेबसीरिज ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली. 'दगडू विचारे' नावाचं पात्र तू मला साकारायला दिलेस माझ्यावर विश्वास टाकलास. ॲमेझॉन प्राईम सारखा प्लॅटफॉर्म सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर सर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर , किशोर कदम सर अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली."
तो पुढे लिहितो, "नटाला प्रत्येक वेळेला चांगलं काम करायची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहलेला डायलॉग तुलाच सारखा सारखा ऐकवतो..'शुक्रिया सेठ ....काम देने के लिए नही...भरोसा रखने के लिये'
आपला सिद्धू."
'मटका किंग' सीरिज आजपासून अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. सीरिज पाहून प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. ही सीरिज १९६० च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित असून सट्टेबाजीच्या (मटका) विश्वातील एका सामान्य माणसाचा 'मटका किंग' बनण्यापर्यंतचा थरार यात पाहायला मिळत आहे.