'मी कोणाला घाबरत नाही', नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर कुब्रा सैतचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:31 IST2026-04-02T09:31:03+5:302026-04-02T09:31:53+5:30
Kubbra sait: 'संकल्प' या Socio-Political Drama असलेल्या सीरिजमध्ये कुब्रा सैत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली असून तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकरांनी स्क्रीन शेअर केली आहे.

'मी कोणाला घाबरत नाही', नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर कुब्रा सैतचं विधान चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैत सध्या तिच्या 'संकल्प' या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच ओटीटीवर रिलीज झालेली ही सीरिज प्रेक्षकांमध्ये गाजत आहे. Socio-Political Drama असलेल्या या सीरिजमध्ये कुब्रा सैत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली असून तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकरांनी स्क्रीन शेअर केली आहे. या सीरिजच्या निमित्ताने कुब्राने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने नाना पाटेकरांसोबत काम करायचा अनुभव शेअर केला.
अलिकडेच कुब्राने 'एबीपी न्यूज'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'संकल्प' या वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. या सीरिजमध्ये कुब्राने परवीन ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी बोलत असतांनाच तिने सेटवर नाना पाटेकरांचा वावर कसा होता, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं.
या मुलाखतीमध्ये कुब्राला 'नाना पाटेकरांसोबत काम करतांना दडप आलं होतं का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देतांना तिने तिचं मत मांडलं. ''ते खूप चांगले आहेत. त्यांच्या सोबत काम करायचा अनुभव खरंच खूप छान होता. आपले जे सिनिअर कलाकार असतात ना ते कधीच येऊन तुम्हाला काही शिकवणार नाही. त्यांच्या कृतीतून आपोआप आपल्याला शिकायला मिळतं. आणि हो, जे पुढे पुढे येऊन तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतात ना त्यांच्याकडून खरंच काही शिकायला मिळत नाही. नाना सर स्वत: त्यांची स्क्रिप्ट लिहितात. जे सेटवर आल्यानंतर त्यांच्या व्हॅनिटीमध्ये कधीच ते जात नाही. जोपर्यंत शुटिंग सुरु असतं तोपर्यंत ते सेटवरच बसून असतात. त्यांच्या या लहान लहान कृतीतूनच खूप काही शिकायला मिळतं. त्यांच्याकडून मी नकळतपणे खूप काही शिकले'', असं कुब्रा म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''मला त्यांच्यासोबत काम करतांना जराही दडपण आलं नव्हतं. मुळात मी कोणालाही घाबरत नाही. जर तुम्ही मनात ग्रह केला की, ते सिनिअर आहेत मग मला त्यांना घाबरलं पाहिजे. किंवा, माझी चूक झाली तर ते मला ओरडतील तर हे सगळं चूक आहे. कारण, या फक्त माझ्या मनाच्या कल्पना आहेत. पण, सेटवर ते कधीही मला ओरडले नाहीत. आणि, जर कधी माझ्या कामावरुन ते मला ओरडले तर ते नक्कीच माझ्या चांगल्यासाठी असेल.'' दरम्यान, 'संकल्प'नंतर कुब्रा 'फर्जी 2' मध्ये झळकणार आहे. या प्रोजेक्ट व्यतिरिक्त ती अन्यही काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.