ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:47 IST2024-04-23T16:47:15+5:302024-04-23T16:47:35+5:30
द लीजेंड ऑफ हनुमान च्या चौथ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता

ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज
आज हनुमान जयंती. बजरंगबलीवर अनेकांची भक्ती आहे. हनुमान शक्तीचं प्रतीक आहे. आज सगळीकडे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. प्रभू श्रीरामाचा निस्सीम भक्त हनुमानावर आतापर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. ओटीटीवर आलेली 'द लीजेंड ऑफ हनुमान' (The Legend Of Hanuman) ही सीरिजही प्रेक्षकांची आवडती आहे. आजच्या दिवशी मेकर्सने या सीरिजच्या पुढील सीझनची घोषणा केली.
'द लीजेंड ऑफ हनुमान' चे आतापर्यंत तीन सीझन आले. तर आता चौथ्या सीझनचीही घोषणा नुकतीच झाली. डिझ्नी प्लस हॉटस्टारवरच सीरिज प्रदर्शित होईल. या सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. फक्त लहानच नाही मोठेही या सीरिजचे चाहते आहेत. हनुमान जयंतीच्या शुभ मुहुर्तावर सीरिजच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली. हॉटस्टारने 4थ्या सीझनचा टीझरही शेअर केला आहे. जो बघून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली. हनुमानाच्या कथेची पुढची कहाणी यामध्ये दाखवण्यात येईल.
मराठमोळा अभिनेता शरद केळकर त्याच्या दमदार आवाजामुळेही ओळखला जातो. गेल्या सीझनमध्ये नरेटर म्हणून त्याने आवाज दिला होता. आता चौथ्या सीनझमध्ये शरदच्या आवाजाची जादू ऐकायला मिळू शकते. या सीरिजमधील अॅनिमेशन आधीच्या सीझनपेक्षा चांगलं असल्याचीही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली. सीरिजचं टीझर पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरश: शहारे आले.