अखेर मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'ची रिलीज डेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:34 IST2025-09-08T17:33:29+5:302025-09-08T17:34:03+5:30
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीची बहुप्रतिक्षित वेबसीरिज द फॅमिली मॅनचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अखेर मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'ची रिलीज डेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल
'द फॅमिली मॅन' (The Family Man Web Series) ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक आहे. या सीरिजचे दोन्ही सीझन प्रचंड यशस्वी झाले आहेत. आता तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता दर्शन कुमार यांनी सीरिजच्या रिलीज डेटबद्दल माहिती दिली आहे.
झूम टीव्हीशी बोलताना दर्शन कुमार म्हणाले, '''द फॅमिली मॅन ३' खूप लवकर येत आहे. दोन ते तीन महिन्यांत ती येऊ शकते. या वेळी ‘मेजर समीर’ तुम्हाला मोठा धक्का देणार आहे. तो एक मास्टरमाइंड आहे, ज्याने भारताच्या विरोधात लोकांना एकत्र आणले आहे.'' तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि निमरत कौर यांचीही एन्ट्री होणार आहे. या नवीन कलाकारांबद्दल बोलताना दर्शन म्हणाले, ''आमच्यासोबत दोन नवीन आणि उत्कृष्ट चेहरे जोडले गेले आहेत, त्यामुळे हा सीझन आणखी चांगला होणार आहे.''
'द फॅमिली मॅन ३' कुठे पाहता येईल?
मनोज वाजपेयी, शारिब हाश्मी, दर्शन कुमार, प्रियामणी आणि इतर कलाकारांनी भरलेली ही स्पाई थ्रिलर सीरिज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर २०२५ च्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे. राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज २०१९ मध्ये सुरू झाल्यापासून भारतातील सर्वात यशस्वी वेबसीरिजपैकी एक मानली जाते. सीरिजच्या टीझरमध्ये श्रीकांत तिवारी (मनोज बाजपेयी) एक कुटुंबप्रमुख आणि गुप्तहेराची भूमिका कशी सांभाळतो, हे दाखवण्यात आलं आहे. टीझरमध्ये जयदीप अहलावत आणि निमरत कौर यांच्या भूमिकांचीही झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे.