'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:26 IST2025-09-16T13:25:46+5:302025-09-16T13:26:14+5:30
मी आर्यनला अनेकदा भेटलो. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की....

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज येत्या काही दिवसात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. लक्ष्य लालवानी, राघव जुयाल, सेहर बम्बा सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर बॉबी देओलचाही महत्वाचा रोल आहे. तसंच करण जोहर, शाहरुख-सलमान-आमिर यांचा कॅमिओही आहे. ही सीरिज खूप धमाल असणार आहे याचा अंदाज ट्रेलरवरुन येतच आहे. नुकतंच एका मुलाखतीत बॉबी देओलने (Bobby Deol) आर्यनसोबतचा अनुभव सांगितला आहे.
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, "मी आणि शाहरुख इंडस्ट्रीतले जुने मित्र आहोत. आमची मुलंही आता मोठी झाली आहेत. जेव्हा आपली मुलं काहीतरी नवीन करायला जातात तेव्हा बाप म्हणून प्रत्येकासाठीच ते खास असतं. आपण त्यांच्या मागे मित्र म्हणूनही उभे असतो. मला रेड चिलीजमधून पहिला कॉल आला आणि कळलं की असा असा शो येतोय ज्याचं दिग्दर्शन आर्यन खान करणार आहे, मी लगेच होकार दिला."
तो पुढे म्हणाला, "मी आर्यनला अनेकदा भेटलो. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की त्याच्यामध्ये केवढी क्षमता आहे. फायर आहे. हा नक्कीच आयुष्यात यश मिळवणार हे मला दिसत होतं. एका रात्री आम्ही गेट टुगेदर केलं. तिथे त्याने मला सीरिजची स्टोरी सांगितली. ७ एपिसोड्सची ही कहाणी आहे. आम्ही ७ तास बोलत होतो. तो ज्याप्रकारे प्रत्येक भूमिकेबद्दल समजावून सांगत होता तेव्हाच मला कळलं की हा काहीतरी भारी बनवणार आहे. त्याने जे केलंय ते आज जेव्हा मी पाहतोय ते खरंच ग्रेट आहे. विशेष म्हणजे हा त्याचा दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव आहे. तो फार कठीण टास्क मास्टरही होता. तो आमच्यामधून सर्वात बेस्ट काम काढून घेत होता. तो अजिबातच गोंधळलेला नव्हता. अतिशय समजूतदारपणे त्याने काम केलं. एकंदर त्याच्यासोबतचा अनुभव खूपच छान होता."