Ashram 3: जपनाम जपनाम, बाबा निराला पुन्हा येणार! बॉबी देओलच्या 'आश्रम'च्या पुढच्या भागाचा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:17 IST2025-01-31T11:16:33+5:302025-01-31T11:17:21+5:30
'आश्रम ३'च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये बाबा निरालाचं भयानक रुप पाहायला मिळत आहे.

Ashram 3: जपनाम जपनाम, बाबा निराला पुन्हा येणार! बॉबी देओलच्या 'आश्रम'च्या पुढच्या भागाचा टीझर
काही गाजलेल्या आणि लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक म्हणजे 'आश्रम'. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या या सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सीरिजचे ३ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणि आता सीरिजचा पुढचा सीझन म्हणजेच तिसऱ्या सीझनचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली असून 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर समोर आला आहे.
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवरुन 'आश्रम ३'च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये बाबा निरालाचं भयानक रुप पाहायला मिळत आहे. बाबा निराला पुन्हा नव्या शिकाराच्या शोधात आहे. पण, ही शिकार भयंकर असू शकते असं त्याचा मित्र त्याला सांगताना दिसत आहे. पण, तरीही तो ऐकत नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे पम्मी आणि आश्रमातील काही महिला बाबा निरालाचा बदला घेण्याचं प्लॅनिंग करताना दिसत आहेत. आता या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
'आश्रम' वेब सीरिजचा पहिला भाग ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पहिल्याच सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याचवर्षी आश्रमचा दुसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. २०२२ मध्ये या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिसऱ्या भागाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये बॉबी देओल, अदिती पोहनकर, त्रिधा चौधरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रकाश झा यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.