"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:09 IST2025-05-15T11:09:00+5:302025-05-15T11:09:47+5:30
इलियानाबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक राज कुमार गुप्ता?

"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
अजय देवगणचा (Ajay Devgn) नुकताच 'रेड २' रिलीज झाला. आयकर अधिकारी अमर पटनायकच्या भूमिकेतून तो पुन्हा पडद्यावर आला. यावेळी अजयसमोर रितेश देशमुख होता. 'रेड २'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमातवाणी कपूर (Vaani Kapoor) अजयची पत्नी आहे. तर 'रेड'च्या पहिल्या भागात इलियाना डिक्रुज (Ileana Dcruz) अजयची पत्नी होती. इलियानालाच दुसऱ्या भागात का घेतलं नाही यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारले होते. आता सिनेमाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी यावर उत्तर दिलं आहे.
२०१८ साली 'रेड' रिलीज झाला होता. अजय देवगणसोबत इलियाना डिक्रुजची जोडी होती. सात वर्षांनी 'रेड २' आला असून यामध्ये वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. यावर नुकतंच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक राज कुमार गुप्ता म्हणाले, 'इलियानाने लग्न केलं आणि ती संसारात रमली. तिला मुलगाही झाला. तिची प्राथमिकता ठरलेली होती. तसंच ती भारताबाहेर शिफ्ट झाली. पण पहिल्या भागात तिच्यासोबत काम करुन खूप छान वाटलं आणि आमच्यासाठी ती कायमच 'रेड'चा भाग राहील."
'रेड २'मध्ये वाणीच्या एन्ट्रीच्या अजिबातच कोणतीही नकारात्मकता नाही. अनेक वेळा सिनेमांमध्ये अपरिहार्य परिस्थितीत अशा प्रकारे कास्टिंग बदलावी लागते. याआधीही असं झालं आहे आणि या सिनेमातही ते बदल करावे लागले. परिस्थितीच अशी येते की एखादी भूमिका वेगळ्याच कलाकाराला साकारावी लागते. इलियाना 'रेड'चा भाग आहे हे अजिबातच नाकारता येणार नाही, असंही ते म्हणाले.
'रेड २' ची कमाई
'रेड २' १ मे रोजी रिलीज झाला. १४ दिवसात सिनेमाने जगभरात १७९.८ कोटींची कमाई केली आहे. तर देशात सिनेमाने आतापर्यंत १३३.४५ कोटी कमावले आहेत. येत्या काही दिवसात सिनेमाने १५० कोटी करेल अशी अपेक्षा आहे. सध्या या सिनेमाला आव्हान देणारा आणखी कोणताही दुसरा चित्करट रिलीज झालेला नाही. याचा 'रेड २' नक्कीच फायदा होऊ शकतो.