उर्वशी रौतेलाला मिळालं प्रेम? 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:16 IST2025-07-14T10:14:12+5:302025-07-14T10:16:22+5:30
उर्वशी रौतेलाच्या स्टोरीमधील 'मिस्ट्री मॅन' कोण?

उर्वशी रौतेलाला मिळालं प्रेम? 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली, कोण आहे तो?
Urvashi Rautela Mystery Man: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही केवळ तिच्या अभिनयामुळेच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. उर्वशी रौतेला अलीकडेच एका 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली. मात्र तेव्हापासूनच विविध चर्चांना सुरूवात झाली आहे. उर्वशीसोबत दिसलेला तो तरूण आहे तरी कोण, ती त्याच्याशी लग्न करणार आहे का असे एक ना अनेक हजारो प्रश्न त्या एका फोटोमुळे उपस्थित झाले आहेत, नेटकऱ्यांनाही असे प्रश्न पडले असून बरीच चर्चा सुरू झाली आहे.
उर्वशी सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ती विम्बल्डन ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्याला उपस्थित राहिली. याचे काही फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीद्वारे शेअर केले. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये टेनिस स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचं दिसलं. या स्टोरीमधील एका फोटोने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. उर्वशी एका 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली. त्या फोटोमध्ये तिने त्याच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावत त्या व्यक्तीची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. अर्थात, हा व्यक्ती तिचा खरा प्रियकर आहे की नाही, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
याआधीही उर्वशी रौतेलाचं नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी एकमेकांविषयी विधानं केल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं. विशेषतः ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशीने एका इंस्टा स्टोरीत हॉस्पिटलचा फोटो शेअर केला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता या नव्या फोटोमुळे चाहत्यांच्या मनात तो 'मिस्ट्री मॅन' कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वशीच्या आयुष्यात खरंच कोणी खास व्यक्ती आली आहे का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच.