दारुच्या नशेत कारची धडक अन् लॉटरी विक्रेत्याचा मृत्यू; अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:36 IST2026-01-02T16:31:19+5:302026-01-02T16:36:45+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिनेत्याच्या कारच्या धडकेत एका निष्पाप नागरीकाचा जीव गेला आहे

दारुच्या नशेत कारची धडक अन् लॉटरी विक्रेत्याचा मृत्यू; अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ प्रभूने मद्यधुंद अवस्थेत केलेल्या बेजबाबदार कृत्याने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सिद्धार्थने चालवलेल्या कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये सिद्धार्थविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नेमकी घटना काय?
ही घटना २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोट्टायम येथील एम.सी. रोडवर घडली. सिद्धार्थ प्रभू आपल्या कारने कोट्टायमकडून येत होता. तेव्हा दारुच्या नशेत असलेल्या सिद्धार्थचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार एका दुसऱ्या वाहनाला धडकली. त्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ५३ वर्षीय कनकराज यांना जोरात धडक दिली. कनकराज हे व्यवसायाने लॉटरी विक्रेते होते. यात कनकराज गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सिद्धार्थला घेराव घातला. तेव्हा त्याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही त्याने हुज्जत घातली आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अखेर चिंघवनम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत सिद्धार्थने मद्यप्राशन केल्याचे सिद्ध झाले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कनकराज यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आता सिद्धार्थ प्रभूवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. सिद्धार्थ प्रभू हा 'थट्टिम मुट्टिम' आणि 'उप्पम मुळकम' यांसारख्या प्रसिद्ध मल्याळम मालिकांमधील अभिनयासाठी ओळखला जातो.