सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला नॅशनल प्लेयर! सांगितलं करीनाचंच घर का निवडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:38 IST2025-01-20T14:38:18+5:302025-01-20T14:38:49+5:30
कदाचित 'यामुळेच' सैफ, चांगली शरीरयष्टी असूनही, त्याला मात देऊ शकला नाही.

सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला नॅशनल प्लेयर! सांगितलं करीनाचंच घर का निवडलं?
सैफ अली खान प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आता पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की हल्लेखोर बांगलादेशातील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होता. कदाचित यामुळेच सैफ, चांगली शरीरयष्टी असूनही, त्याला मात देऊ शकला नाही. एवढेच नाही तर, जर त्याचा हेतू केवळ चोरीचाच होता, तर त्याने करिना - सैफ अली खानचीच इमारत का निवडली? हेही समोर आले आहे.
नॅशनल कुस्तीपटू आहे शहजाद -
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असून तो बांगलादेशी आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, शहजादने बांगलादेशमध्ये राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळल्याचे वृत्तही समोर आले आहे. यामुळेच तो सामान्य उंचीचा असला तरी, धडधाकट व्यक्तिमत्व असलेला सैफ त्याला पकडू शकला नाही. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा शहजादने सांगितले की, तो कमी वजनाच्या गटात राष्ट्रीय पातळीवर कुस्तीगीर आहे. यामुळेच त्याला सैफच्या फ्लॅटवरून निसटून जाण्यास फारशी अडचण आली नाही. आता पोलीस शहजादच्या जबाबांची पडताळणी करतील.
का निवडली करिना-सैफची इमारत -
शहजादने करिना-सैफची इमारतच का निवडली? तर, मिड डेच्या वृत्तानुसार, शहजादने म्हटले आहे की, त्याला सैफची इमारत फारशी उंच वाटली नाही. तो तेथे गेला होता आणि तेथील सेक्यूरिटी कोणत्या वेळी सैल असते, हे त्याला माहीत होते.
परतण्यासाठी हवे होते पैसे -
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहजादने म्हटले आहे की, तो बांगलादेशमध्ये कुस्तीपटू होता. त्याला तेथे काम नव्हते म्हणून तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. येथून परतण्यासाठी ५० हजार रुपयांची आवश्यकता होती. यामुळे तो चोरी करण्यासाठी गेला होता.