'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्राजक्ता माळीचा सर्वात आवडता कलाकार कोण? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:39 IST2025-12-26T09:38:31+5:302025-12-26T09:39:08+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर 'फायनली, आस्क प्राजक्ता' हे प्रश्नोत्तरांचे सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत अनेक अतरंगी प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना प्राजक्ताने आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत उत्तरे दिली.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्राजक्ता माळीचा सर्वात आवडता कलाकार कोण? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या कार्यक्रमातील कलाकार, त्यांचे विनोद आणि तितकंच लोकप्रिय असलेलं या शोचं सूत्रसंचालन चाहत्यांना नेहमीच भुरळ घालतं. कार्यक्रमाची लाडकी सूत्रसंचालक प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गुपित उघड केलं असून, 'हास्यजत्रा'मधील तिचा सर्वात आवडता कलाकार कोण आहे, हे जाहीर केलं आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर 'फायनली, आस्क प्राजक्ता' हे प्रश्नोत्तरांचे सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत अनेक अतरंगी प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना प्राजक्ताने आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत उत्तरे दिली.
अभिनेत्रीचा सर्वात आवडता कलाकार कोण?
या गप्पांच्या दरम्यान एका चाहत्याने विचारलेला प्रश्न सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. त्या चाहत्याने विचारले, "महाराष्ट्राच्या हास्यजत्रामधील तुमचा सर्वात आवडता कलाकार कोण?" यावर प्राजक्ताने दिलेले उत्तर चाहत्यांच्या मनात आधीच घर करून असलेले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना प्राजक्ता म्हणाली, "तुम्हाला माहीत आहे... दादा...". प्राजक्ताने उल्लेख केलेला 'दादा' म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हास्यसम्राट समीर चौघुले आहेत. प्राजक्ता समीर चौघुले यांना प्रेमाने आणि आदराने 'दादा' म्हणते. समीर चौघुले यांचा अभिनय आणि त्यांची कॉमेडी ही प्राजक्ताची सर्वात आवडती असल्याचे तिने या उत्तरातून स्पष्ट केले.

'वाह दादा वाह'ची लोकप्रियता
समीर चौघुले हे प्राजक्ताचे आवडते कलाकार असणे, ही चाहत्यांसाठी फार मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. कारण, शोच्या शूटिंग दरम्यान समीर चौघुले यांचे एखादे स्किट सुरू असताना प्राजक्ता नेहमीच उत्स्फूर्तपणे 'वाह दादा वाह!' अशी दाद देताना दिसते. तिची ही दाद देण्याची पद्धत प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली आहे की, त्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत असतात. समीर चौघुले यांच्याबद्दल प्राजक्ताने कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक मुलाखतींमध्ये तिने समीर यांच्या टायमिंगचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा 'हास्यजत्रा'मधील कलाकारांमधील मैत्रीपूर्ण नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर प्रेक्षकांसमोर आला आहे.