कुठला बाप आपल्या लेकीला अपशब्द उच्चारतो?; ‘साजिरी’नं विचारला किरण मानेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 19:44 IST2022-01-16T19:21:34+5:302022-01-16T19:44:42+5:30
सतत मनस्ताप, मानसिक दबाव आणत होते. मी फार कुणाशी बोलत नसायचे. मी स्वत:ला हिरोईन समजते का? असं बोललं जायचं असा आरोप अभिनेत्री दिव्या पुगांवकर हिने अभिनेता किरण माने यांच्यावर केला आहे.

कुठला बाप आपल्या लेकीला अपशब्द उच्चारतो?; ‘साजिरी’नं विचारला किरण मानेंना सवाल
सातारा – अभिनेता किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यानं स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप चॅनेलवर करण्यात आला. राज्यात सध्या यावरुन भाजपाविरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते असा सामना पाहायला मिळत आहे. भाजपाविरोधात बोलल्यानेच किरण मानेंची गंच्छंती झाल्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत. तर याप्रकरणी किरण मानेंसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सडेतोड भूमिका मांडत किरण माने यांच्या स्वभावावर टीका केली आहे.
यावरुन मुलगी झाली हो मालिकेत साजिरीची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर हिने किरण मानेंच्या वर्तवणुकीवर भाष्य केले आहे. दिव्या पुगांवकर म्हणाल्या की, सुरुवातीची काही महिने सोडले तर त्यानंतर जे काही सुरु झाले. एकतर मी या शोची हिराईन असल्याने ते त्यांना खटकायचं. त्यावरुन सतत टोमणे मारायचे. माझ्या वडिलांविरोधात बोलले, मला उघडउघड टोमणे मारायचे. माझ्याविरोधात अपशब्द बोलायचे. कुठला बाप आपल्या मुलीला अपशब्द उच्चारतो? असा सवाल दिव्यानं अभिनेता किरण मानेंना विचारला आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तसेच सतत मनस्ताप, मानसिक दबाव आणत होते. मी फार कुणाशी बोलत नसायचे. मी स्वत:ला हिरोईन समजते का? असं बोललं जायचं. मालिकेचे शुटींग थांबणार नाही. ही मालिका सुरुच राहणार आहे. गैरवर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेकडून काढण्यात आले. अचानक त्यांना काढण्यात आले नाही. सेटवर इतर कलाकारांशी जी वागणूक होती ती चुकीची होती म्हणून त्यांना तिनदा वॉर्निंग देण्यात आली होती. वारंवार सांगूनही किरण माने यांच्या स्वभावात बदल होत नव्हता असंही अभिनेत्री दिव्या पुगांवकर यांनी सांगितले आहे.
चित्रिकरण थांबवण्याचा प्रयत्न
साताऱ्यात ज्या गावात मुलगी झाली हो मालिकेचे चित्रिकरण सुरु आहे त्याठिकाणी ग्रामपंचायतीच्या लोकांनी पत्र देऊन मालिका चित्रिकरण थांबवण्याची मागणी केली. परंतु जेव्हा हे किरण माने प्रकरणात सत्य त्यांना समजलं तेव्हा एकही मिनिट चित्रिकरण थांबवले नाही अशी माहिती अभिनेत्री श्रावणी पिल्लई यांनी दिली.