वीणा जगतापने फिरवली कलाविश्वाकडे पाठ? अभिनयाला रामराम करण्याविषयी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:23 IST2023-09-27T13:20:03+5:302023-09-27T13:23:18+5:30
Veena jagtap: वीणाने अभिनय सोडून अन्य एका क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे

वीणा जगतापने फिरवली कलाविश्वाकडे पाठ? अभिनयाला रामराम करण्याविषयी म्हणाली...
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप (veena jagtap). बिग बॉस मराठीमुळे (bigg boss marathi) प्रकाशझोतात आलेली वीणा सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत वीणाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात तिचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच तिने कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या सगळ्या चर्चांवर आता तिने मौन सोडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून वीणा कलाविश्व सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर अभिनय सोडून तिने अन्य एका क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या चर्चांवर तिने भाष्य केलं आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अभिनयाला रामराम करण्याच्या चर्चा फुटकळ असल्याचं म्हटलं आहे.
"मी सहसा कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. मी आजारी असेन, माझी दुसरी कोणती काम सुरु असतील किंवा आलेल्या भूमिकेचं शुटिंग बाहेरगावी असेल तरच मी एखादा प्रोजेक्ट नाकारते. नाहीतर, मला विचारण्यात आलेल्या भूमिका मी आवर्जून करते. पण, मध्यंतरी मी मेकअपचा कोर्स केल्यानंतर एका चॅनलने मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार अशी बातमी दिली. त्यानंतर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण, माझ्याबद्दल हे सगळं लिहितांना एकदा मला फोन करुन खरंखोटं विचारलं नाही. त्यामुळे मी यापुढे अभिनय करणार नाही अशी बातमी पसरली", असं वीणा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "आज मला स्पष्ट करायचं आहे की, मी अभिनय सोडलेला नाही. मध्यंतरी मी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते. त्यानंतर योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेत काम केलं. मध्यंतरी मी प्रोफेशनल मेकअप शिकले. कारण, माझयाकडे तेव्हा थोडा मोकळा वेळ होता आणि आपल्या क्षेत्राशी संबंधित अभिनयाव्यतिरिक्तही आणखी काही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, म्हणून मी अधूनमधून काही ना काही शिकत असते. मी जो कोर्स केला हा त्याचाच भाग आहे. पण, याचा अर्थ असा अजिबात नाही की मी अभिनय सोडून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणार आहे."