"ही क्रूर बाब, आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:27 IST2025-05-23T10:25:05+5:302025-05-23T10:27:28+5:30
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली...

"ही क्रूर बाब, आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट
Vaishnavi Hagwane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. १६ मे रोडी वैष्णवी हगवने यांनी सासरच्या मंडळीकडून होणारा मानसिक छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. आता प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळींसह अनेक कलाकारांनी देखील या घटनेबद्दल राग व्यक्त केला आहे. अभिनेता हेमंत ढोमे, पुष्कर जोग, प्रवीण तरडे यांसारख्या कलाकारांनंतर या प्रकरणी मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नुकतीच सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत वैष्णवी हगवने मृत्यू प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपींनी योग्य ती शिक्षा द्या, अशी मागणी देखील तिने त्याद्वारे केली आहे. या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, "ही माणसं शिकलेली, पैशाने श्रीमंत असली तरी ही मानसिकता की सुनेला मारहान करुन दरवेळी माहेर कडून काही न काही आणायला सांगणे ही क्रूर बाब आहे. आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी. आता जर हे प्रकरण दाबले तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..., यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे."
यासह अभिनेत्रीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टॅग देखील केलं आहे. "आपलीच लाडकी बहीण... या घटनेचा जाहीर निषेध...!", अशी पोस्ट लिहून अश्विनी महांगडेने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सासरा, दीर पोलिसांच्या ताब्यात...
दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.