"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:47 IST2025-07-18T12:38:23+5:302025-07-18T12:47:20+5:30
छोट्या पडद्यावरील 'उंच माझा झोका' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली...
Tejashree Walavalkar : छोट्या पडद्यावरील 'उंच माझा झोका' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका २०१२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री तेजश्री वालावलकरने साकारली होती. इतकंच नाही तर या मालिकेचं शीर्षक गीतही प्रचंड लोकप्रिय झालं. या मालिकेतून आपल्या सहज सुंदर अभिनयाने तेजश्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं आहे.
नुकतीच तेजश्रीने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, तिला सोशल मीडियाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 'तुला तुझं आयुष्य प्रायव्हेट ठेवावं वाटतं, म्हणून सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट केलं होतं का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल सांगताना तेजश्री म्हणाली, "कधीकधी असं म्हटलं जातं तुम्ही सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहात याच्यावर तुमचं टॅलेन्ट ठरतं, असं मला वाटतं नाही. जर तुमच्यात टॅलेन्ट असेल तर सोशल मीडियाच तुम्हाला उचलून घेतं. मी जेव्हा काही प्रोजेक्ट करत होते तेव्हा मी सोशल मीडियाकडे तेवढं लक्ष नाही दिलं. अर्थात ती काळाची गरज आहे. शिवाय मला असं वाटतं आपल्या थोड्या काही गोष्टी प्रायव्हेट राहाव्यात, त्यामुळे मधला मधला काळ हा मी त्या पद्धतीने जगले. " असं मत तिने व्यक्त केलं.
तेजश्रीने 'उंच माझा झोका' मालिकेनंतर एका मालिकेत काम केलं होतं. मात्र त्यानंतर तिने अभिनय सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. 'आजी आणि नात', 'चिंतामणी', 'मात' यांसारख्या सिनेमांमध्ये तेजश्रीनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून काम करत असलेल्या तेजश्रीनं मालिकेसह अनेक बालनाट्य, बालचित्रपट, लघुपटांमध्ये काम केलंय.