'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे अडकली लग्नबंधनात, युवा उद्योजकाशी गुपचूप बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:34 IST2026-03-28T11:34:12+5:302026-03-28T11:34:41+5:30
'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. शुक्रवारी (२७ मार्च) मयुरीने स्वप्नील मराठे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे अडकली लग्नबंधनात, युवा उद्योजकाशी गुपचूप बांधली लग्नगाठ
मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. ईशा डे, रुमानी खरे, अपूर्वा गोरे, रेवती लेले यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. 'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. शुक्रवारी (२७ मार्च) मयुरीने स्वप्नील मराठे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मयुरी आणि स्वप्नील यांचा विवाहसोहळा पार पडला. मयुरीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
मयुरीने तिच्या आयुष्यातील खास क्षणासाठी सुंदर लूक केला होता. डिझायनर लेहेंग्यात ती नटली होती. तर स्वप्नील यांनी तिला ट्विनिंग करत खास सूट परिधान केला होता. त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्वप्नील मराठे यांच्याशी लग्न केल्यानंतर मुळची पुण्याची असलेली मयुरी आता ठाण्याची सून झाली आहे.
मयुरीने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझा होशील ना', 'घाडगे अँड सून', 'जय देवा श्री गणेशा', 'सरस्वती', 'छत्रीवाली', 'देवीलोक', जाऊ नको दूर बाबा या मालिकांमध्ये ती झळकली. स्टार प्रवाहवरील 'उदे गं अंबे' या मालिकेने मयुरीला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने देवी अंबाबाईची भूमिका साकारली होती. 'तेरी लाडली मै' या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे.
कोण आहे मयुरीचा नवरा?
मयुरीचा नवरा स्वप्नील मराठे हे ठाण्यातील एक युवा उद्योजक आहेत. ठाण्यातील युवान ग्रुपचे सर्वेसर्वा असलेले स्वप्नील हे रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची 'युवान फाउंडेशन' संस्था कार्यरत आहे. त्यांनी नुकताच 'कडीपत्ता' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.