"स्फोटांचे आवाज, खिडकीतून बाहेर...", टीव्ही अभिनेत्याला कुटुंबियांनी सांगितली जम्मूतील परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 11:48 IST2025-05-10T11:47:59+5:302025-05-10T11:48:28+5:30
टीव्ही अभिनेत्याने जम्मूत असलेल्या आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि तो भावुक झाला.

"स्फोटांचे आवाज, खिडकीतून बाहेर...", टीव्ही अभिनेत्याला कुटुंबियांनी सांगितली जम्मूतील परिस्थिती
सध्या भारत-पाकिस्तान दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती आहे. आधी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि २६ पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला. यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. पाकिस्तान यामुळे सैरभैर झाला आणि त्यांनी भारतातील जम्मूमध्ये ड्रोन हल्ले केले. सलग दोन रात्र हा प्रकार घडला. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. दरम्यान जम्मूमध्ये गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकआऊट आहे. अनेकांचे तिथे कुटुंबीय आहे. टीव्ही अभिनेत्याने जम्मूत असलेल्या आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि तो भावुक झाला. कुटुंबियांसोबत काय बोलणं झालं ते आता त्याने सांगितलं आहे.
'कुमकुम भाग्य' फेम अभिनेता कृष्णा कौल (Krishna Kaul) सध्या आपल्या कुटुंबियांसाठी चिंतेत आहे. कृष्ण मूळचा जम्मूचा असून त्याचे आईवडील तिथेच आहेत. कृष्णाने भावुक पोस्ट शेअर करत लिहिले, "जम्मूमध्ये असणाऱ्या माझ्या कुटुंबियांसोबत बोलणं झालं. त्यांना स्फोटाचे आवाज येत आहेत. खिडकीतून त्यांना ड्रोनही दिसत आहेत. पूर्णत: ब्लॅकआऊट झालं आहे. पण ते अजिबातच घाबरलेले नाहीत. त्यांना आपल्या सैन्यावर आणि मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे. आपण या युद्धात सत्याच्या बाजूने उभे आहोत याचा मला आनंद आहे. भारतीय संरक्षण दलाचे खूप आभार."
याआधी टीव्ही अभिनेता अली गोनीनेही त्याच्या कुटुंबियांविषयी काळजी व्यक्त केली होती. तसंच भारतीय हवाई दलाचे आभार मानले होते. अभिनेते अनुपम खेर यांचे नातेवाईकही जम्मूमध्ये आहेत. त्यांनीही नातेवाईकांची विचारपूस केली होती. सध्या जम्मू आणि जवळच्या भागांमध्ये ब्लॅकआऊट असून रोज रात्री पाकिस्तान तिथे ड्रोन हल्ले करत आहे.