"मराठी मुलीला दुखावलं तुम्ही"; प्रसिद्ध अभिनेत्रीने 'तारक मेहता' मालिका सोडली; पोस्ट लिहून व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:59 IST2025-12-09T11:57:50+5:302025-12-09T11:59:10+5:30
'तारक मेहता...' मालिकेतील एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मालिका सोडली आहे. सेटवर मिळालेली वागणूक यासाठी कारणीभूत आहे, अशी चर्चा आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

"मराठी मुलीला दुखावलं तुम्ही"; प्रसिद्ध अभिनेत्रीने 'तारक मेहता' मालिका सोडली; पोस्ट लिहून व्यक्त केला संताप
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष टीव्ही इंडस्ट्रीत TRP च्या शर्यतीत अव्वल आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल मात्र गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. या मालिकेतील अनेक कलाकारांनी अपमानास्पद आणि असभ्य वर्तणवणूक दिल्यामुळे मालिकेच्या टीमवर आरोप केले होते. अशातच मालिकेतील एका मराठी अभिनेत्रीला असाच विचित्र अनुभव आल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर
एका मराठी मुलीला दुखावलं...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सुनिताची भूमिका मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता शिसोडे साकारत होती. पण प्राजक्ताने मालिका सोडली आहे. याविषयी प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ''तारक मेहता मालिकेच्या टीमकडून मला सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव टाकला जातोय. याशिवाय मी पोस्ट डिलीट केली की नाही यासाठी ते माझं सोशल मीडिया अकाऊंट तपासत आहेत.''
''माझी सर्व मराठी अभिनेत्रींना विनंती आहे की, tmkoc मालिकेत सुनिता ही व्यक्तिरेखा साकारु नका. ती व्यक्तिरेखा मालिकेत अजिबात महत्वाची नाहीये. हा माझा अनुभव आहे. आपण फक्त नोकर किंवा भाजीवाली ही भूमिका साकारण्यासाठी जन्म घेतला नाहीये'', असा खुलासा प्राजक्ताने केला आहे. या पोस्टखाली प्राजक्ताने कॅप्शन लिहिलंय की, 'मनापासून काम करत होती मी, एका मराठी मुलीला दुखावलं तुम्ही. असो....देव तुमचं भलं करो.'
याआधीही प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, ''ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नाही त्यांच्यासाठी स्वतःचा स्वाभिमान कधीही सोडू नका.'' या पोस्टखाली प्राजक्ताने ''आता बास्स झालं'', असं कॅप्शन लिहिलं होतं. अशाप्रकारे मालिकेच्या सेटवर मिळालेल्या वागणुकीमुळे प्राजक्ताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. अनेकांनी प्राजक्ताच्या निर्णयाचं समर्थन केलं असून तिला पाठिंबा दिला आहे. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या टीमवर टीका केली आहे.