"वर्षभर कोकणातला माणूस याच आवाजाची वाट...", गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचली अभिनेत्री, शेअर केला खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 09:55 IST2025-08-31T09:54:28+5:302025-08-31T09:55:07+5:30
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कोकणात तिच्या गावी पोहोचली आहे. तिने कोकणातील गणेशोत्सवाचे खास क्षण शेअर केले आहेत. पाहा हा खास व्हिडिओ.

"वर्षभर कोकणातला माणूस याच आवाजाची वाट...", गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचली अभिनेत्री, शेअर केला खास व्हिडीओ
सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून 'गावी जायचं' या एका ओढीवर कोकणी माणूस वर्षभर या सणाची वाट पाहत असतो. मुंबईतून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गौरी गणपती सणाला गावाकडे जातात. सर्वसामान्यांप्रमाणेच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारही सणासुदीला आपल्या मूळ गावी जातात. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे सुद्धा गणेशोत्सवासाठी तिच्या कुटुंबासोबत कोकणातील माहेरी गेली आहे.
तितीक्षा तिच्या असरोंडी या गावी गेली आहे. तिनं कोकणातील गणेशोत्सवाचे खास क्षण शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भजनाच्या कार्यक्रमाची झलक पाहायला मिळत आहे. "वर्षभर कोकणातील माणूस या भजनाच्या आवाजाची आतुरतेने वाट पाहत असतो" असं कॅप्शन तितीक्षाने या व्हिडीओला दिलं आहे. तितीक्षाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "हे सुख फक्त आपल्या कोकणात आहे", "भजनाक मेन्यू काय आसा?", "भजन म्हणजे सुख…खरंच आतुरतेने वाट पाहत असतो", अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
गेल्या वर्षीही तितीक्षा तिचा पती आणि अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह कोकणात तिच्या माहेरी गेली होती. सिद्धार्थ हा नाशिकचा असून, तितीक्षा मूळची कोकणातील आहे. सणासुदीला ती नेहमीच आपल्या कुटुंबीयांसोबत कोकणात जाते. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तितीक्षाने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुरुची अडारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या सोबतीने साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे.