'महाभारत'मधील भीमवर आली उपासमारीची वेळ, आर्थिक मदतीसाठी केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 18:31 IST2021-12-25T18:31:15+5:302021-12-25T18:31:45+5:30
७२ वर्षीय प्रवीण कुमार सोबती (Pravin Kumar Sobati)आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

'महाभारत'मधील भीमवर आली उपासमारीची वेळ, आर्थिक मदतीसाठी केली विनंती
छोट्या पडद्यावरील 'महाभारत' (Mahabharat) या मालिकेनं अनेक पिढ्यांच्या मनात घर केले आहे.दूरदर्शनवरील ही लोकप्रिय मालिका होती. आजही लोक या मालिकेविषयी तितक्याच उत्सुकतेने बोलतात. नुकतेच लॉकडाउनमध्ये या मालिकेचे पुनःप्रसारन करण्यात आले होते. त्यावेळी देखील या मालिकेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांची ओळख आजही कायम आहे. मात्र मालिकेतील एक असा कलाकार आहे, ज्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा कलाकार दुसरा कोणी नसून या मालिकेतील 'भीम' (Bheem) ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Pravin Kumar Sobati) आहेत.
७२ वर्षीय प्रवीण कुमार सोबती आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. बऱ्याच वर्षांपासून ते घरी बसून आहेत. या वयात काम करू शकत नसल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जवळच्या सर्व नातेवाईकांनी त्यांची साथ सोडल्याचे ते सांगतात. सध्या त्यांची पत्नी त्यांची काळजी घेते. त्यांना एक मुलगी आहे, जिचे लग्न झाले आहे. ते आपल्या पत्नीसोबत आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
प्रवीण कुमार सोबती यांनी व्यक्त केली नाराजी
अमृतसर पंजाबमध्ये जन्मलेल्या प्रवीण यांनी १९६६ मध्ये कॉमन वेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकले होते. त्यांनतर एशियन स्पर्धेत दोन वेळा गोल्ड मेडल पटकावले आहे. इतके सर्व असूनही आज ते अत्यंत बिकट अवस्थेत जगत आहेत. त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आजपर्यंत पंजाबमध्ये अनेक शासन येऊन गेले, मात्र त्यांना कोणीही पेन्शन दिली नाही. सर्वात उत्तम कामगिरी करून आणि मेडल जिंकूनही त्यांना पेन्शनसारखी सुविधा देण्यात आलेली नाही. सध्या त्यांना बीएसएफची पेन्शन मिळत आहे. मात्र ही पेन्शन अपूरी पडते आहे.