सतत अंगावर सूज, हिमोग्लोबिन कमी झालं अन् त्यात..; 'थोडं तुझं थोडं माझं'मधील अभिनेत्रीला गंभीर आजार
By देवेंद्र जाधव | Updated: July 18, 2025 16:53 IST2025-07-18T16:50:24+5:302025-07-18T16:53:43+5:30
'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून ती तीन महिने आराम करत होती. काय झालं होतं नेमकं?

सतत अंगावर सूज, हिमोग्लोबिन कमी झालं अन् त्यात..; 'थोडं तुझं थोडं माझं'मधील अभिनेत्रीला गंभीर आजार
मराठी मनोरंजन विश्वातून एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेतील अभिनेत्रीला गंभीर आजार झाल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मानसी घाटे. मानसीने सोशल मीडियावर पोस्ट करुन तिच्या आजारपणाबद्दल सर्वांना माहिती सांगितली आहे. मानसीला तीन महिन्यांपूर्वी गंभीर आजार झाला होता. या आजारपणावर मात करुन मानसी 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत पुन्हा परतली आहे. पण आजारपणाची गंभीर लक्षणं मानसीवर दिसत आहेत. मानसीला जो आजार झाला होता, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
मानसीला झालेला हा गंभीर आजार
मानसीने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलं की, "ह्या सगळ्याची सुरुवात इथून झाली. सतत अंगावर सूज आणि हिमोग्लोबिन कमी होतं. Petscans, Water Tapping, Endoscopies आणि बरंच काही. रोज स्वतःला मॉनिटर करणं आणि खूप साऱ्या गोळ्या घेणं. अखेर ३ महिन्यांच्या आरामानंतर मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार होते. मनात थोडी भीती होतीच! मी इतका वेळ शूट करू शकेन का? मला झेपेल का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण स्वामींची कृपा आणि माझ्या प्रोड्यूसर, दिग्दर्शक, सहकलाकार, माझं कुटुंब आणि मित्र परिवार सर्वांच्या भक्कम आधारामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे आज मी उभी राहू शकले."
"आपल्यावर प्रेम करणारे इतके लोक आपल्या आजूबाजूला आहेत हे पाहून मन पुन्हा पुन्हा भरून येत होतं. माझी आई, दादा, वहिनी माझा नवरा आणि बाकीचे नातलग सगळ्यांनीच मला खूप धीर दिला. हे माझे सहकलाकार नसून माझं दुसरं कुटुंबच आहे. रोज फोन करून तब्येतीची विचारपूस करणं आणि ह्या आजारातून मला लवकरात लवकर बाहेर पडता यावं ह्या साठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत होते."
"आपल्या पडत्या काळात आपले जवळचे आणि आपली जोडलेली माणसं हेच आपल्या मदतीला धावून येतात. स्वामींचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व जवळच्या लोकांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मी आज हा दिवस पाहू शकते. तुमची लाडकी छाया एका नव्या रुपात. असंच भरभरून प्रेम करत रहा." अशाप्रकारे मानसीने तिला झालेल्या गंभीर आजाराचा खुलासा केला. मानसी तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत परतल्याने सेटवर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं.