"त्याने माझा फोटो आणि स्वत:चा QR कोड वापरुन...", अमित भानुशालीच्या नावाने उकळले पैसे; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:45 IST2024-03-07T16:44:58+5:302024-03-07T16:45:24+5:30
"कष्टाने कमवलेले पैसे...", अमित भानुशालीचा फोटो वापरुन फॅन पेजने चाहत्यांकडून घेतले पैसे, अभिनेता संतापला

"त्याने माझा फोटो आणि स्वत:चा QR कोड वापरुन...", अमित भानुशालीच्या नावाने उकळले पैसे; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं?
'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अर्जुन सुभेदार हे पात्र साकारून अभिनेता अमित भानुशाली घराघरात पोहोचला. 'ठरलं तर मग' या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. अमित सोशल मीडियावर सक्रिय असून त्याद्वारे चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो.
अमितने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून अमितने चाहत्यांना कोणत्याही अकाऊंटवर ऑनलाईन पैसे न पाठविण्याची विनंती केली आहे. "तुम्ही आमचे चाहते आहात. तुमच्यामुळे आमचा शो खूप चांगला चालला आहे. चाहते आमच्यावर प्रेम करतात आणि आमच्या नावाने काही फॅन पेजही सुरू करतात. असं माझंही एक फॅनक्लब आहे. त्याचे बरेच फॉलोवर्सही आहेत. पण, त्या फॅन क्लबकडून माझा फोटो वापरून आणि स्वत:च्या बँक अकाऊंटच्या स्कॅनरने डोनेशनसाठी चाहत्यांकडून पैसे मागितले. आणि लोकांनी पैसे पाठवलेदेखील...पण, मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तो मी नाहीये. त्या फॅन क्लबशी मी बोललो आणि त्यांना हे सगळं बंद करून अकाऊंट पण बंद करण्यास सांगितलं आहे," असं अमित यात म्हणताना दिसत आहे.
पुढे त्याने चाहत्यांना ऑनलाइन पैसे न पाठविण्याची विनंती केली आहे. "मला याबाबत चाहत्यांचे मेसेज आले की "दादा आम्ही पैसे पाठवले". पण मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती. मी याबाबत पोलिसांनाही सांगितलं आहे. तो युपीआय कोडही मी त्यांना दिला आहे. या गोष्टी आयुष्यात घडत राहणार आहेत. पण, आपण सगळेच खूप कष्टाने पैसे कमवतो. आपल्या कुटुंबीयांसाठी आपण हे सगळं करतो. त्यामुळे हे पैसे चुकीच्या कामासाठी वापरले गेले नाही पाहिजेत. एका अभिनेत्याचा फोटो आला म्हणून पैसे पाठवू नका, ही माझी विनंती आहे."
अमित भानुशालीने त्याच्या पोस्टमध्ये फॅन पेजची लिंक शेअर करत हे अकाऊंट रिपोर्ट करून ब्लॉक करण्याची विनंती चाहत्यांना केली आहे. त्याबरोबरच त्याने "ऑनलाइन कोणालाही पैसे पाठवू नका", असंही म्हटलं आहे.