"सकाळी ६ वाजताच…", फटाक्यांच्या आवाजामुळे अभिनेत्रीची झाली झोपमोड, व्यक्त केला संताप, म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 12:00 IST2025-10-26T11:53:44+5:302025-10-26T12:00:53+5:30
फटाक्यांच्या आवाजामुळे झाली झोपमोड, अभिनेत्री भडकली; म्हणाली-"लोक विश्रांती करत असताना..."

"सकाळी ६ वाजताच…", फटाक्यांच्या आवाजामुळे अभिनेत्रीची झाली झोपमोड, व्यक्त केला संताप, म्हणते...
Tv Actress: सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे या सणासुदीच्या दिवसांत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा स्तर बिघडला आहे. यावर अनेकदा प्रशासनासह अनेक कलाकार मंडळी देखील नागरिकांना फटाके न फोडण्याचं आवाहन करत असतात. मात्र, ही परिस्थितीत आजही 'जैसे थे' आहे. त्यात आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने फटाक्यांच्या त्रासाला वैतागून संताप व्यक्त केला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून करिश्मा तन्ना आहे.

फटाक्यांमुळे सर्वसामान्यांसह अनेक मुक्या प्राण्यांना देखील त्रास होतो. शिवाय यामुळे प्रदुषणात देखील भर पडते. याबाबत सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून अभिनेत्री करिश्मा तन्नाने आपलं मत मांडलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करत अभिनेत्रीने त्यामध्ये म्हटलंय, 'सकाळी ६ वाजता मला फटाक्यांच्या आवाजाने जाग आली.लोकं विश्रांती घेत असताना कोणीतरी मोठ्या आवाजात फटाके फोडत होतं. त्याच क्षणी माझ्या डोक्यात विचार आला, आपल्या आजुबाजूची हवा इतकी प्रदूषित झाली आहे, पाळीव प्राणी फटाक्यांमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे घाबरून लपत आहेत. मग खरंच आपण सण साजरे करत आहोत का? हा खरंच आनंद आहे का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.
यापुढे करिश्माने म्हटलंय, "मोठा आवाज म्हणजे आनंद, धूर म्हणजेच उत्सव साजरे करणं, मुक्या प्राण्यांना घाबरवणं आणि स्वत:लासुद्धा धुराचा त्रास करून घेणं आपण आपल्या मुलांना हे शिकवतोय का? मुक्या प्राण्यांमध्ये भीती निर्माण करणं, प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षा आपण आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं, दिवे लावणं आणि सगळीकडे आनंद पसरवणं म्हणजे सण साजरा करणं ही जाणीव त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. खरंतर, आपण अशी पिढी घडवूया ज्यांच्यासाठी सण म्हणजे आनंद आणि शांतता पसवरणं हे महत्वाचं असेल प्रदुषण करणं नाही. दरम्यान, ही पोस्ट थोडी उशिराच पोस्ट केली, पण काय करणार? हे फटाके थांबतच नाहीत.म्हणून पोस्ट शेअर करणं मला गरजेचं वाटलं."असं देखील अभिनेत्रीने याद्वारे स्पष्ट केलं आहे.
करिश्मा तन्नाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'क्योंकी सांस कभी बहू थी' मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. तसेच तिने 'कयामत की रात', 'पल्की' आणि 'नागिन- ३' या मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे.