'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मधील तात्या आजोबा लहान मुलांचे आवडते, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:53 IST2022-01-27T16:46:31+5:302022-01-27T16:53:50+5:30
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava) हि मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'मधील तात्या आजोबा लहान मुलांचे आवडते, जाणून घ्या कारण
झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava) हि मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे तात्या आजोबांची. हि भूमिका जेष्ठ अभिनेते सी.एल. कुलकर्णी अगदी चोख निभावत आहेत. असे आजोबा आपल्या कुटुंबात देखील हवे हे मालिका पाहताना प्रकर्षाने जाणवतं. त्यांच्या या लोकप्रिय भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, "तात्या म्हणजे एक रसिक, सुजाण, समंजस, कर्तृत्ववान, परंतु कुटुंबवत्सल, चुकीला चूक मानणारं, वेळ पडल्यास आनंदाने निसंकोचपणे शरण जाणारं निर्मळ व्यक्तिमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी हा त्या व्यक्तिमत्वाचा गाभा. कुठल्याही बाबीचा सर्वांकष विचार करून, नीरक्षीर विवेकाने अडचणींवर मत करून कोणालाही न दुखावता सरात्मक तोडगा काढण्याचा त्यांचा स्वभाव.
सामाजिक दायित्वाची जाण असणारा, एकजुटीचं महत्व जाणणारा, घरात धाक पण तरीही अतिरेकी जाच नसणारा, विचारी, विवेकी, चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देणारा, खेळकर, आनंदी, प्रगतिशील आणि आदर्श माणूस. कोणालाही हवीहवीशी आणि आपलीशी वाटणारी अशी हि व्यक्तिरेखा, विशेतः लहान मुलांना हे तात्या आजोबा फार आवडतात हे लक्षात आलंय माझ्या." नाती जोडून ठेवण्यासाठी कुलकर्णी काकांनी एक मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे, "समाज सौष्ठवासाठी आधी कुटुंब बांधता आलं पाहिजे. आपण प्रत्येकासाठी आहोत आणि प्रत्येकजण आपला आहे हि भावना हा त्यासाठी एक महत्वाचा धागा आहे. माणूस हा त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारावा लागतो. हे सगळं या मालिकेतून अतिशय उत्तमरीत्या दाखवलं आहे त्यामुळे हि मालिका प्रेक्षकांना देखील आवडतेय याचा मला आनंद आहे."