बिग बींना भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं! मराठी अभिनेत्यानं सांगितला 'लय भारी' भेटीचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:40 IST2025-10-12T12:38:59+5:302025-10-12T12:40:25+5:30
मराठी अभिनेत्यानं नुकतीच सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बींना भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं! मराठी अभिनेत्यानं सांगितला 'लय भारी' भेटीचा अनुभव
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. अमिताभ बच्चन यांचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. अमिताभ यांना भेटण्याचं अनेकांचं हे स्वप्न असतं, असंचं स्वप्न मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी बाळगलं होतं आणि ते पूर्णही झालंही. स्वप्नील राजशेखर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अमिताभ बच्चन यांच्या भेटीबद्दल आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा अविस्मरणीय अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
स्वप्नील राजशेखर अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर 'बिग बी' अमिताभ बच्चन यांना भेटले. या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांनी लिहलं, "मै आपको छू के देखना चाहता हु…आप सच मे हो… या कोई जादुई अफवाह फैली हुई है पिछले पचास सालों से?!" असं म्हणालो होतो मी त्याला कापऱ्या आवाजात… त्यावर मनापासुन लोभस हसला होता तो… डोळ्यात कौतुक, प्रेम होतं त्याच्या… (मला तरी जाणवलं.. मनाचे खेळ असतील, तरी असोत…) आणि माझ्या डोळ्यात साक्षात तो दिसल्याचा अविश्वास होता… आपले सगळे मेडीकल प्रोटोकॉल बाजुला ठेवुन हात पुढे करत त्या बच्चनी आवाजात तो म्हणाला "चलिए हाथ मिलाते है…" माझा थरथरता हात काही क्षण त्याच्या हातात होता…"
स्वप्नील पुढे म्हणतात, "त्याला भेटायची संधी यापुर्वी एक दोनवेळा आली होती…. पण माझं धाडस होत नव्हतं…. कसं व्हावं… ?! अभिनेता- चाहता एवढंच नाही ना आमचं कनेक्शन!! (त्याच्या बाबतीत एवढ्यापुरतं रहातही नसेल कुणाचं….) माझं आयुष्य त्याने व्यापलेलं… १९७० च्या मध्यातला जन्म माझा… म्हणजे अ अमिताभचा, ब बच्चनचा हेच गिरवलंय आमच्या पिढीने… आणि समज आली तसा मी जो त्याच्या पंथाला लागलो ते आजपर्यंत…. तो समोर दिसला तर मला सहन होईल ?! बेभान झालो तर… ?! लहानपणापासुनचं सगळं प्रेम किंवा त्याहुनही गहिरं जे काही आहे ते उचंबळून आलं तर ?! किंवा समजा त्याला पाहुन विरक्तीच आली, 'पुरे झालं आता… प्रत्यक्ष तो भेटलाय….' असं वाटुन संसारातुन मन उडालं तर ?! मुलं आहेत, बायको आहे.. म्हातारी आई आहे… असे विचार मनात यायचे पुर्वी"
स्वप्नील यांनी लिहलं, "पण आताशा वाटत होतं की एकदा त्याला बघुया तरी… खरंच आहे का तो !! आंखो देखी होऊ दे… बरं तो आधीसारखा दैवी आणि अप्राप्य राहिलेला नाही आता.. माणुसपणाच्या असंख्य खुणा दिसतायत त्याच्यात… आता सोसवेल मला…आणि अशात यंदा आमचा रोहित हळदीकर एके दिवशी अचानक म्हणाला “दादा, बच्चनला भेटुया चल…” मी हिय्या केला… घरच्यांचा सल्ला घेतला…आणि भेटलो त्याला… दोनवेळा!! तरीही मी जिवंत आहे… दोनदा त्याचा परिसस्पर्श होऊनही… अनुभवलेलं सांगतो... जगात देव आहे… वाढदिवसाच्या शुभेच्चा बिग बी", असं त्यांनी म्हटलं. स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.