का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:00 IST2025-10-22T11:00:28+5:302025-10-22T11:00:50+5:30
सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी एकत्र दिवाळी साजरी केलेली नाही. दोघांचेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे फोटो समोर आले आहेत. मात्र ते दोघेही एकमेकांच्या फोटोंमधून गायब आहेत.

का रे दुरावा? सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या नात्यात बिनसलं, दिवाळीलाही एकत्र दिसलं नाही जोडपं
मराठीतील सेलिब्रिटी कपल असलेले सुयश टिळक आणि आयुषी भावे पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आले आहेत. सुयश आणि आयुषीच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. याला कारण ठरलेला सुयश टिळकने शेअर केलेला एक व्हिडीओ. सुयशने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत सिंगल असल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासूनच सुयश आणि आयुषीच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. आता दिवाळीतही हे दोघे एकत्र दिसलेले नाहीत.
सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी एकत्र दिवाळी साजरी केलेली नाही. दोघांचेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे फोटो समोर आले आहेत. मात्र ते दोघेही एकमेकांच्या फोटोंमधून गायब आहेत. सुयशने त्याच्या अकाऊंटवरुन लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो त्याच्या आईवडिलांसोबत दिसत आहे. मात्र या फोटोंमध्ये आयुषी दिसत नाही.
आयुषीनेही तिच्या सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. आयुषीने सुयशच्या कुटुंबीयांसोबत नाही तर तिच्या माहेरच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सुयश टिळक आणि आयुषी भावेने २१ ऑक्टोबर, २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. आणि त्याच वर्षी ७ जुलैला साखरपुडा केला होता. त्यांचे दोन्ही समारंभाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करत होते.
परंतु आता लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. कारण त्यांनी सोशल मीडियावरील एकमेकांसोबतचे लग्नासोबत सर्व फोटोही हटवले आहेत. त्यामुळे ते दोघे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.