सुलभा आर्या यांची लव्हस्टोरी माहितीये का? लग्नासाठी मुस्लिम नवऱ्याने धर्मच बदलला, तर सासूने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:47 IST2025-10-09T13:46:55+5:302025-10-09T13:47:48+5:30
सुलभा आर्या यांचे पती प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. ईशान आर्या असं त्यांचं नाव होतं.

सुलभा आर्या यांची लव्हस्टोरी माहितीये का? लग्नासाठी मुस्लिम नवऱ्याने धर्मच बदलला, तर सासूने...
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या यांना सगळेच 'कल हो ना हो' सिनेमामुळे ओळखतात. शाहरुख आणि सैफसोबतचा तो सीन आजही लोकांना हसवतो. सध्या सुलभा आर्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. सुबोध भावेच्या आजीची भूमिका त्या साकारत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी आपली प्रेमकहाणी सांगितली.
सुलभा आर्या यांचे पती प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. ईशान आर्या असं त्यांचं नाव होतं. ते खरंतर मुस्लिम होते मात्र सुलभा यांच्याशी लग्न करायचं असल्याने त्यांनी आर्य समाजात धर्मांतर केलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपली लव्हस्टोरी सांगताना सुलभा आर्य म्हणाल्या, "जिकडे प्रेम असतं तिकडे जिद्द असतेच. त्यातही माझ्या नवऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाची जिद्द जास्त होती असं मी म्हणेन. त्याने आधी आर्य समाजात धर्मांतर केलं मग आमचं लग्न झालं. धर्मांतराची अट आमची कोणाचीच नव्हती. माझ्या आईवडीलांचीही नव्हती. त्या काळात हिंदू मुस्लिम मॅरेज स्वीकारणं कठीणच होतं. त्यात मी फिल्म इंडस्ट्रीतली होते. माझ्या नवऱ्याचं असं होतं की आपलं लग्न झाल्याचा ठप्पा लागला पाहिजे. बाकी नंतर तू माझ्या बरोबर राहा किंवा १० वर्ष राहून नकोस जे करायचं ते कर. त्यामुळे मला माझ्या करिअरला पाठिंबा देणारी सगळी चांगलीच माणसं मिळाली."
"मला माझ्या सासूचा प्रश्न होता. त्या नमाज वगैरे पठण करायच्या. मी कधी त्यांना बुरखा वगैरे घातलेलं पाहिलं नव्हतं. त्या खऱ्या मुख्याध्यापिका होत्या. पण आपल्या दोन्ही धर्मांमध्ये कट्टर माणसं असतातच. पण मला तशी नाही भेटली. माहेरचीही नाही आणि सासरचीही नाही. माझ्या आईवडिलांना सगळे देवमाणसंच म्हणायचे. त्यांना कशाला दुखवायचं असं सगळ्यांना वाटायचं. जे काही झालं ते वाढत नाही गेलं. लग्नानंतर लगेच तो आईवडिलांना येऊन भेटलाही होता. तेव्हाही काही तमाशा झाला नव्हता. पण लोकांनी सगळ्यांनी स्वीकारलं. सासरच्यांनीही स्वीकारलं. अनेकांनी माझ्या सासूला सांगितलं होतं की आता ती आलीये तर त्यांचा निकाह करु. पण त्या नाही म्हणाल्या. त्या म्हणाल्या असत्या तर मी तेही केलं असतं. कारण माझ्यासाठी माणसं जास्त महत्वाची होती."
"मी २१ व्या वर्षी लग्न केलं. लग्नाआधी मी सुलभा गुप्ते होते. लग्नानंतर सुलक्षा आर्या झाले. तेव्हा माझं नाटकांमध्ये काम करणं सुरुच होतं. मुलगा झाल्यानंतर तीन वर्ष मी घरी होते. नंतर बीएड केलं. मग परत तीन वर्ष घरी होते. माझे मुस्लिम सासू सासरेही खूप शिकलेले होते. कधीच त्यांनी कशालाही विरोध केला नाही. मुलांसाठी मी स्वत:हूनच ब्रेक घेतला होता."
"माझी मुलं, नवरा असे डिमांडिंग नव्हते. नातेवाईकांनीही सांभाळलं. घरुन कायमच पाठिंबा होता. माझं या क्षेत्रात यायचं ठरलं तसंही नव्हतंच. पण मी काम सुरु केलं तरी त्यांचा विरोध नव्हता. सासरकडूनही विरोध नव्हता. आज मला नवऱ्याची खूप आठवण येते. पण माहेरची आणि सासरची सगळीच लोक मला जवळची आहेत. त्यामुळे मला कधीच एकटं वाटत नाही. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते."