'बाईपण जिंदाबाद'मधील पहिल्या कथेत झळकणार सुकन्या मोने आणि प्रार्थना बेहेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:00 IST2025-10-20T16:59:33+5:302025-10-20T17:00:43+5:30
Baipan Zindabad Serial : कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच 'बाईपण जिंदाबाद' ही नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेच्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतर्मन, तिचं धैर्य, आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसतो.

'बाईपण जिंदाबाद'मधील पहिल्या कथेत झळकणार सुकन्या मोने आणि प्रार्थना बेहेरे
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच 'बाईपण जिंदाबाद' ही नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेच्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतर्मन, तिचं धैर्य, आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसतो. समाजाच्या चौकटीत न अडकता ती स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क मिळवते. तिचं बाईपण म्हणजे फक्त नात्यांचं ओझं नव्हे, तर प्रेम, जीवनसृजन आणि आत्मभानाचं प्रतीक आहे. ही मालिका स्त्रीच्या अश्रूंमागचं सामर्थ्य, शांततेतील आवाज आणि हसण्यातली जिद्द दाखवणारी हृदयस्पर्शी सफर आहे. २६ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री ८ वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे.
'बाईपण जिंदाबाद' या मालिकेत आपल्या आवडत्या मराठी अभिनेत्री सुकन्या मोने, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर, शलाका पवार, दीपा परब, उर्मिला कोठारे, आणि प्रार्थना बेहेरे झळकणार आहेत. या सर्वजणी एका समान सूत्राने जोडल्या गेल्या आहेत. ‘स्त्रीत्वाचा उत्सव’. प्रत्येक अभिनेत्री आपल्या व्यक्तिरेखेतून वेगवेगळ्या भावनांना आकार देते. कधी संघर्षाची कहाणी सांगते, कधी सोडून देण्याचं धैर्य दाखवते, तर कधी जगण्याचा नवा अर्थ शोधते. ही मालिका प्रत्येक मराठी स्त्रीला स्वतःचा आरसा दाखवणारा प्रयत्न आहे. आईपणाचं उबदारपण, पत्नीपणाचं ओझं आणि ‘स्वतः’ असण्याची धडपड या मालिकेच्या प्रत्येक भागात जिवंत होते.
मालिकेची पहिली कथा असिस्टंट माझी लाडकी ही स्वप्नाळू माधवी (सुकन्या कुलकर्णी मोने) हिची आहे जी एका वर्कहोलिक बॉसखाली (प्रार्थना बेहेरे) असिस्टंट म्हणून काम करते. वर्कहोलिक बॉस आणि तिची नवी असिस्टंट एकमेकांना तोडीस तोड ठरणार की त्यांच्यात एक छान मैत्रीचं नातं निर्माण होणार? दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांचा हा अनोखा दृष्टिकोन ‘असिस्टंट माझी लाडकी’ या भागात अनुभवायला मिळेल.