६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..."
By कोमल खांबे | Updated: December 16, 2024 14:59 IST2024-12-16T14:58:43+5:302024-12-16T14:59:04+5:30
सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली.

६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..."
सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट नट आहे. नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्वच माध्यमांतून विविधांगी भूमिका साकारून त्याने अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. सुबोधच्या 'तू भेटशी नव्याने' या मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अवघ्या सहा महिन्यांतर ही मालिका बंद झाली. या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर मालिकेत केला गेला होता. मालिका संपल्यानंतर आता सुबोधने प्रतिक्रिया दिली आहे.
सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "आता मला २-३ वर्ष मालिका करणं शक्य नाही. ही मालिकादेखील एका वर्षाची होती. २-३ वर्ष चालणारी ही मालिका नव्हती. पण, त्याच्यात चॅनेलला जास्त ग्रोथ दिसली नसावी. शेवटी कोणती मालिका चालू ठेवायची आणि कोणती बंद करायची हा निर्णय चॅनेल घेतं. ही मालिका चालू ठेवण्यात अर्थ नाही, असं कदाचित त्यांना वाटलं असावं, म्हणून त्यांनी मालिका बंद केली असावी".
'तू भेटशी नव्याने' ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. ८ जुलैला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. तर आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत सुबोधसोबत अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत होती.
'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमात सुबोध आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातून पहिल्यांदाच ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद गोखले यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २० डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.