'स्टार प्रवाह'ची लोकप्रिय मालिका ६ महिन्यांतच होणार बंद, लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:17 IST2025-03-19T11:17:11+5:302025-03-19T11:17:26+5:30
काही महिन्यांपूर्वी अशीच एक पौराणिक कथेवर आधारित असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र आता ही मालिका बंद होणार असल्याचं समजत आहे.

'स्टार प्रवाह'ची लोकप्रिय मालिका ६ महिन्यांतच होणार बंद, लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
स्टार प्रवाह ही लोकप्रिय टीव्ही वाहिनी आहे. या वाहिनीवरच्या मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असल्याचंही दिसतं. वेगवेगळे विषय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. काही महिन्यांपूर्वी अशीच एक पौराणिक कथेवर आधारित असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र आता ही मालिका बंद होणार असल्याचं समजत आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सांगणारी 'उदे गं अंबे उदे' ही मालिका काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाहवर सुरू झाली होती. मात्र आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतून साडेतीन शक्तिपीठांची कहाणी अगदी सविस्तर आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळेच अगदी कमी वेळातच मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. ११ ऑक्टोबरला मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. पण, आता अवघ्या ६ महिन्यांतच मालिकेला गाशा गुंडाळावा लागत आहे.
'उदे गं अंबे उदे' मालिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत होती. तर देवदत्त नागेने भगवान शंकराची भूमिका साकारली. सायंकाळी ६.३० वाजता मालिकेचं प्रसारण होत होतं. आता 'उदे गं अंबे उदे' मालिका बंद झाल्यानंतर त्याजागी कोणती नवी मालिका सुरू होणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. स्टार प्रवाह परिवार सोहळ्यात 'कोण होतीस तू काय झालीस तू' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र अद्याप ही मालिका कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही अपडेट मिळालेली नाही.