सोनू सूदने 'संपूर्णा' मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर केला लॉन्च, म्हणाला - "ही केवळ एक कथा नाही, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:18 IST2025-08-30T17:18:32+5:302025-08-30T17:18:48+5:30

Sonu Sood : नुकतेच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने 'संपूर्णा' मालिकेचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाँच केला आहे.

Sonu Sood launched the trailer of the star plus series 'Sampoorna' on social media, said - ''This is not just a story, but...'' | सोनू सूदने 'संपूर्णा' मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर केला लॉन्च, म्हणाला - "ही केवळ एक कथा नाही, तर..."

सोनू सूदने 'संपूर्णा' मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर केला लॉन्च, म्हणाला - "ही केवळ एक कथा नाही, तर..."

स्टार प्लस (Star Plus) 'संपूर्णा' (Sampoorna Serial) ही नवीन मालिका दाखल होत आहे. ही केवळ एक टिव्हीवरील मालिका नाही, तर अनेक स्त्रियांच्या वास्तवातील संघर्षांची झलक आहे. अशा संघर्षांची, जे अनेकदा बंद दरवाज्यांआड लपलेले असतात. ही मालिका ८ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद(Sonu Sood)ने 'संपूर्णा' मालिकेचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाँच केला आहे.

सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'संपूर्णा' मालिकेचा ट्रेलर लाँच केला आहे आणि लिहिले की, गणेश चतुर्थीच्या रंगात आणि आनंदात हरवून जाणं सोपं आहे, पण आपल्या आजूबाजूला अनेक महिला आहेत ज्या दररोज अशा लढाया लढत आहेत, ज्या त्यांना कधीच लढायच्या नव्हत्या. हा ट्रेलर पाहून मी हेलावून गेलो, कारण ही केवळ एक कथा नाही... तर आपल्या समाजाचं प्रतिबिंब आहे. यंदा जर मी बाप्पाकडे एकच प्रार्थना करायची असेल, तर ती अशी की, त्यांनी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील विघ्न दूर करावीत. यासोबतच सोनूने हे देखील सांगितलं की, 'संपूर्णा' ही एक शक्तिशाली नवीन मालिका आहे, जी स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. ही कथा पाहणं, अनुभवणं आणि समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही  मालिका ८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'संपूर्णा' मालिकेच्या ट्रेलरमध्ये मिट्टी नावाच्या एका महिलेची कथा उलगडली जाते. सात वर्षांपासून आपलं वैवाहिक जीवन सांभाळणारी, आणि चार वर्षांच्या मुलाची आई असलेली मिट्टी तिचं आयुष्य बाहेरून परिपूर्ण वाटतं. पण आयुष्य नेहमी तसंच नसतं. एका क्षणात तिचं जग बदलून जातं, जेव्हा तिला समजतं की तिचा नवरा डॉ. आकाश याला एका गंभीर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आकाश स्वतःला निर्दोष सांगतो आणि या संपूर्ण प्रकरणात त्याला अडकवलं गेलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. मालिकेची सुरुवात नयना नावाच्या एका स्वतंत्र, बेधडक मुलीपासून होते, जी प्रेमाच्या शोधात असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कथेमध्ये नाट्यमय वळणं येतात. एक प्रतिष्ठित डॉक्टरवर ती इतका गंभीर आरोप का करेल? आणि त्यामागे कोणती गूढ सत्यं दडलेली आहेत? असे प्रश्न उपस्थित होतात. 

Web Title: Sonu Sood launched the trailer of the star plus series 'Sampoorna' on social media, said - ''This is not just a story, but...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.