बांदेकरांच्या लाडक्या सिंबाचं निधन, सोहमने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "गेल्या १७ वर्षांपासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:57 IST2025-12-19T15:57:01+5:302025-12-19T15:57:46+5:30
बांदेकर फॅमिलीचा लाडका सिंबा असलेल्या श्वानाचं निधन झालं आहे. सोहम बांदेकरने ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

बांदेकरांच्या लाडक्या सिंबाचं निधन, सोहमने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "गेल्या १७ वर्षांपासून..."
बांदेकर कुटुंबीय ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय फॅमिली आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. बांदेकराच्या घरातून एक दु:खद बातमी येत आहे. बांदेकर फॅमिलीचा लाडका सिंबा असलेल्या श्वानाचं निधन झालं आहे. सोहम बांदेकरने ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सोहमने सिंबाचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. सिंबाच्या आठवणीत सोहम भावुक झाला आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, "माझ्या आयुष्यातील २८ वर्षांपैकी जवळपास १७ वर्ष माझा पार्टनर, रुममेट, माझा आधार, माझा पाठिंबा आणि माझं प्रेम आम्हाला सोडून देवाच्या सानिध्यात राहायला गेलं आहे. निस्वार्थ आणि निर्मळ प्रेम दिल्याबद्दल आभारी आहे. तू आमच्यासोबत कायम राहशील. तुमच्यापैकी अनेकांनी सिंबाला प्रेम दिलं, त्याची विचारपूस केली आणि त्ाच्या तब्येतीबाबत जाणून घेत होतात. प्रत्यक्ष भेट झाली नसली तरीही तुम्ही त्याच्यावर भरभरुन प्रेम केलं. ते प्रेम आणि आपुलकी तोदेखील अनुभवत होता. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार". सोहमच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.
सिंबाचं बांदेकर कुटुंबीयांशी फार भावनिक नातं होतं. बांदेकर कुटुंबाचा सिंबा एक भाग होता. पूजानेही लग्नाच्या वेळी मेहेंदीमध्ये सिंबावरचं प्रेम व्यक्त करत त्याचं चित्र काढलं होतं. आता तो सोडून गेल्याने सगळ्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.