यश-नेहा पुन्हा एकत्र! 'माझी तुझी रेशीमगाठ 2' नाही तर चाहत्यांना मिळालं भलतंच सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 18:38 IST2024-02-01T18:37:39+5:302024-02-01T18:38:33+5:30
काय आहे नेमकं सरप्राईज?

यश-नेहा पुन्हा एकत्र! 'माझी तुझी रेशीमगाठ 2' नाही तर चाहत्यांना मिळालं भलतंच सरप्राईज
सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता ठणठणीत बरा झाला आहे. डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा धक्का आला तेव्हा सर्वच चाहत्यांनी त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली होती. सर्वांच्या प्रार्थनेमुळे श्रेयस त्या कठीण परिस्थितीतून बाहेर आला. बरा झाल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी त्याने चाहत्यांना एक खास सरप्राईजही दिलं.
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) यांची जोडी 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकली होती. यश आणि नेहा म्हणून ते घराघरात पोहोचले. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मालिका संपल्यानंतर लगेच प्रेक्षकांनी मालिकेचा भाग 2 कधी येणार असं विचारायला सुरुवात केली. आताही श्रेयस आणि प्रार्थनाला तुम्ही परत कधी सोबत दिसणार हा प्रश्न हमखास विचारला जातो. याचंच उत्तर श्रेयस आणि प्रार्थनाने नुकतंच इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत दिलं आहे.
आधी तर श्रेयसने सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. तो रुग्णालयात असताना सर्व चाहत्यांनी प्रार्थना केली यामुळेच तो बरा होऊ शकला असं म्हणत त्याने सर्वाचे आभार मानले. यानंतर प्रार्थना बेहेरेही या लाईव्ह चॅटमध्ये आली. तेव्हा दोघांनी चाहत्यांना सरप्राईज सांगितलं. श्रेयस म्हणाला, "तुम्हाला सगळ्यांनाच आम्हाला एकत्र पाहण्याची इच्छा आहे माहित आहे. माझी तुझी रेशीमगाठला तुम्ही भरभरुन प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. अद्याप मालिकेच्या पुढच्या भागावर काहीही चर्चा झालेली नाही. पण आज आम्ही भेटलोय ते एका सिनेमाची चर्चा करण्यासाठी. सिनेमाचं narration आम्ही आता ऐकणार आहोत. सगळं काही जुळून आलं, गोष्ट आवडली तर तुमचे लाडके यश आणि नेहा तुम्हाला एका वेगळ्या अवतारात नक्कीच दिसतील."
यश आणि नेहाला एकत्र बघून चाहते तर खूश झाले. मात्र हे दोघंही मालिकेत नाही तर चक्क एका सिनेमात एकत्र येणार आहेत. त्यामुळे चाहते आणखी उत्सुक झाले आहेत. तरी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या प्रेक्षकांना अजूनही सीक्वेलचीच प्रतिक्षा आहे. त्याआधी दोघांचा सिनेमा आला तर नक्कीच त्याचाही चाहत्यांना आनंद घेता येणार आहे.