"लालबागचा राजाला सेलिब्रिटींचीही रांग हवी", शिव ठाकरे स्पष्टच बोलला, म्हणाला, "मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 16:02 IST2023-09-28T16:02:09+5:302023-09-28T16:02:57+5:30
"कधी कधी मला भीती वाटते की रांगेतील लोक म्हणत असतील...", 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला गेलेल्या शिव ठाकरेने व्यक्त केली खंत

"लालबागचा राजाला सेलिब्रिटींचीही रांग हवी", शिव ठाकरे स्पष्टच बोलला, म्हणाला, "मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर..."
राज्यात सगळीकडेच यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला गेला. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दर्शनाला येत असतात. यावर्षीही बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मराठमोळा शिव ठाकरेही 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक झाला. यावेळी त्याने 'लोकमत फिल्मी'शी गप्पा मारल्या.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या शिवने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना खंत व्यक्त केली. शिव म्हणाला, "देशातील प्रत्येक कोपऱ्यातील व्यक्तीला लालबागचा राजा माहीत आहे. मला थेट मूर्तीपर्यंत घेऊन जात दर्शन मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी मला भीती वाटते की रांगेतील लोक म्हणत असतील बघ आम्ही पण उभे आहोत. सेलिब्रिटींचीही एक रांग असली पाहिजे, असं मला वाटतं. जेणेकरुन आम्हालाही थोडे प्रयत्न करावे लागतील. मला मनातून थोडसं गिल्टी वाटत आहे."
शिवने यावेळी लालबागचा राजाच्या मंडळातील कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं. "दहा दिवस हे मंडळ एवढं सगळं मॅनेज करतं. त्यांना माझा सलाम. मी १०-१५ मिनिटांत दर्शन करुन आलो. पण, मंडळातील कार्यकर्ते दिवसभर जल्लोषात काम करत असतात. रात्रभर ते झोपत नाहीत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझा मानाचा मुजरा," असंही शिव म्हणाला.