'ठरलं तर मग'च्या सेटवर सायलीची आवडती व्यक्ती कोण? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:52 IST2025-09-05T13:51:33+5:302025-09-05T13:52:04+5:30
जुई गडकरीने नुकत्याच घेतलेल्या 'आस्क मी सेशन'मध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

'ठरलं तर मग'च्या सेटवर सायलीची आवडती व्यक्ती कोण? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा
'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच ऑफस्क्रीन बॉण्डिंगमुळेही चर्चेत असतात. मालिकेत सायली (जुई गडकरी) आणि अर्जुनची (अमित भानुशाली) जोडी प्रेक्षकांना आवडते. पण, सेटवर मात्र खऱ्या आयुष्यात जुईची सर्वात जवळची मैत्रीण कोण आहे, याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
जुई गडकरीने नुकत्याच घेतलेल्या 'आस्क मी सेशन'मध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने तिला सेटवरील सर्वात जवळच्या मैत्रिणीबद्दल विचारले. यावर जुईने सांगितले की, सेटवर तिची सर्वात जवळची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या ऑनस्क्रीन सासूबाई, म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे आहेत.
प्राजक्ता दिघे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जुईने लिहिले, "मी माझ्या मनात फार काही ठेवत नाही, पण प्राजू (प्राजक्ता) मला सेटवर आईची कमी भासू देत नाही. ती माझे खूप लाड करते आणि वेळ पडल्यास ओरडतेसुद्धा. आम्ही दोघी रूम पार्टनर्स पण आहोत".
'सायली' हीच आवडती भूमिका
दुसऱ्या एका चाहत्याने जुईला, "तुझी आतापर्यंतची सर्वात आवडती मालिका कोणती?" असा प्रश्न विचारला. यावर जुईने सांगितले, "मी माझ्या सगळ्याच भूमिकांवर खूप प्रेम केलं. पण, ज्या भूमिकेने माझ्यावर प्रेम केलं, ती आहे सायली! सायलीने मला ते सगळं दिलं, ज्याची मी वाट पाहत होते". 'ठरलं तर मग' ही मालिका गेले अडीच वर्षे टीआरपीमध्ये आघाडीवर आहे. जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होते.