"शेतकरी बांधवाला आपली गरज...", मराठवाड्यासाठी कलाकार पुढे सरसावले, सौरभ चौघुलेचं चाहत्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:29 IST2025-09-27T11:29:04+5:302025-09-27T11:29:45+5:30
पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत.

"शेतकरी बांधवाला आपली गरज...", मराठवाड्यासाठी कलाकार पुढे सरसावले, सौरभ चौघुलेचं चाहत्यांना आवाहन
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नद्यांना पूर आल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून घरांसह पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत.
अभिनेता सौरभ चौघुलेने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. कल्याणमधील अखिल भारतीय नाट्य परिषदतर्फे कलाकार मदत करणार आहेत. व्हिडीओत सौरभ म्हणतो, "नमस्कार, आज मी तुमच्यासमोर एका कारणासाठी आलोय. ते कारण म्हणजे सोलापूर, बीड, मराठवाडा या ठिकाणी झालेल्याअतिवृष्टीसंदर्भात... मराठवाड्यातील शेतकरी बांधवाला आज आपली गरज आहे. तिथे त्यांचं खूप नुकसान झालंय. त्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेतील कलाकार ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम सुरू केली आहे. २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत तुम्ही सहखुशीने त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तुम्ही पाठवू शकता. अत्रे मंदीर येथे संध्याकाळी ४ ते ८ वाजता सगळे कलाकार असणार आहेत. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत तिकडे येऊन नक्की करा. आज आपल्या शेतकरी बांधवाला आपली गरज आहे. त्यासाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं आहे".
राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली. केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे.