हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
By कोमल खांबे | Updated: October 10, 2025 13:10 IST2025-10-10T13:10:00+5:302025-10-10T13:10:36+5:30
३६व्या वर्षी साराने अभिनेता आणि निर्माता असलेल्या क्रिश पाठकसोबत संसार थाटला आहे. पण, हिंदू अभिनेत्याशी लग्न केल्याने साराला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिलं आहे.

हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
'बिग बॉस' फेम आणि हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री सारा खानने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. ३६व्या वर्षी साराने अभिनेता आणि निर्माता असलेल्या क्रिश पाठकसोबत संसार थाटला आहे. ६ ऑक्टोबर रोजी क्रिश आणि साराने कोर्ट मॅरेज केलं. लवकरच ते पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पण, हिंदू अभिनेत्याशी लग्न केल्याने साराला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिलं आहे.
साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "तुमचं प्रेम आणि शुभेच्छा यासाठी आभारी आहे. पण, मला अजून काहीतरी सांगायचं आहे. क्रिश आणि माझा धर्म वेगळा आहे. पण दोन्ही धर्म प्रेमाची शिकवण देतात. आमच्या कुटुंबीयांनाही आम्हाला प्रत्येकाचा आदर करा अशीच शिकवण दिली आहे. त्यासोबतच कोणालाही दु:ख देऊ नका, अशी शिकवण दिली आहे. ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना धन्यवाद आणि ज्यांनी ट्रोल केलं त्यांच्यासाठी एक मेसेज द्यायचा आहे".
"कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आणि व्यक्तींचा अनादर करायला शिकवत नाही. आमच्या चाहत्यांसोबत आमचा हा आनंद शेअर केला. लग्नासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आमच्या कुटुंबाकडून आणि कायद्यानेही आम्हाला ती परवानगी दिली आहे. कोणताही धर्म वाईच बोलायला शिकवत नाही. तुम्ही तुमच्या धर्मावर प्रेम करत असाल तर चांगलं बोला. माझ्यामुळे वाईट बोलून पाप करू नका. आम्ही निकाह आणि पारंपरिक सप्तपदी अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहोत", असं म्हणत साराने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
सारा खानचे हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी तिने 'बिग बॉस'च्या घरात असताना अली मर्चंट याच्याशी लग्न केलं होतं, पण ते नातं फक्त दोन महिनेच टिकलं होतं. आता ती क्रिशसोबत संसार थाटणार आहे. कोर्ट मॅरेजनंतर डिसेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा होणार आहे. क्रिश हा रामायणातील लक्ष्मणाची भूमिका साकारलेल्या सुनील लहरी यांचा मुलगा आहे.